
मटणाचा तुकडा घशात अडकल्याने एका 54 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ऐन सणाच्या दिवशी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बनोथ बिच्छा असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मयत शेतकऱ्याच्या मुलाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
टीव्ही भारतवर्षने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या महबूबाबाद जिल्ह्यातील गुडूर मंडळात दुर्गाम्मा सणाच्या दिवशी ही घटना घडली. दुर्गाम्मा सणानिमित्त घरी खास मटणाचा बेत केला होता. दुपारी कुटुंबासोबत जेवत असताना बनोथ यांच्या घशात मटणाचा तुकडा अडकला. यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकला आणि ते बेशुद्ध झाले.
कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ गुडूर येथील सरकारी रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. ऐन सणाच्या दिवशी कुटुंबप्रमुखाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


























































