केरळमधील मंदिराच्या उत्सवात फटाक्यांमुळे दोन हत्ती बिथरले; 3 भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमी

केरळातील कोझिकोड येथे एका मंदिरात उत्सवाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. उत्सवादरम्यान फोडलेल्या फटाक्यांच्या आवाजाने दोन हत्ती बिथरले आणि मंदिरात सैरावैरा पळू लागले. यावेळी बिथरलेल्या हत्तीने मंदिरातील भिंतीला जोरदार धडक दिली. यामुळे भिंत कोसळली आणि ढिगाऱ्याखाली दबून तीन भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य 30 जण जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोझिकोडमधील कोयिलंडी येथील कुरुवंगगडच्या मनकुलंगरा मंदिरात ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मंदिरात उत्सवादरम्यान फटाके फोडण्यात आले. फटाक्यांच्या आवाजाने दोन हत्ती बिथरले आणि ही दुर्घटना घडली. या घटनेत दोन महिला आणि एका पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य 30 भाविक जखमी झाले.

जखमी भाविकांना उपचारासाठी कोयिलंडी तालुका रुग्णालय आणि कोझिकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अम्मुकुट्टी, लीला आणि राजन अशी मयतांची नावे असून ते कुरवंगगडचे रहिवासी आहेत.