
नवी मुंबईतून हवाई प्रवासाचे स्वप्न उद्या तब्बल 18 वर्षांनी साकार होत आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशी आणि कार्गो विमानसेवा सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी 30 विमानांचे टेकऑफ या विमानतळावरून होणार असून सुमारे चार हजार प्रवाशी हवाई प्रवास करणार आहेत. या प्रवाशांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापाने जोरदार तयारी केली आहे. बंगलोर येथून येणारे पहिले विमान सकाळी आठ वाजता नवी मुंबई विमानतळावर लॅण्डिंग करणार आहे. नंतर त्याच विमानाचे पावणेनऊ वाजता हैदराबादच्या दिशेने टेकऑफ होणार आहे.
देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड एअरपोर्ट म्हणून ओळख असलेल्या
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्यापासून प्रवाशी आणि कार्गो विमानांची सेवा सुरू आहे. पहिल्या दिवशी कोची, हैदराबाद, बंगळुरू, गोवा, अहमदाबाद या शहरांना हवाई मार्गाने जोडले जाणार आहे. पहिल्या दिवशी सुमारे चार हजार प्रवाशी या विमानतळावरून हवाई प्रवास करणार आहेत. प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. नवी मुंबई विमानतळावरील ख्रिसमसच्या मुहूर्तावर केलेला प्रवास अविस्मरणीय ठरावा यासाठी सिडको आणि अदानी समूहाच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत. महिनाभर प्रवाशांच्या स्वागतासाठी अनेक उपक्रम विमानतळावर पार पडणार असून येत्या 15 जानेवारीपर्यंत दररोज होणाऱ्या उड्डाणांची संख्या 48 पर्यंत जाणार आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस विमानांच्या टेकऑफमध्ये वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा मात्र मार्च 2026च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर नवी मुंबई शहर हे देशातील शहरांबरोबर जगभरातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे.
मुंबई देशातील सर्वात मोठे हवाई हब
नवी मुंबई विमानतळ सुरू होणार असल्याने दोन विमानतळे असलेले मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे. दिल्लीमध्ये दोन विमानतळ असले तरी दुसरे विमानतळ अद्याप सुरू झालेले नाही. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवाशी प्रवास करणार आहेत. विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर हीच प्रवाशी संख्या नऊ कोटीपर्यंत जाणार आहे.
तिसऱ्या रनवेची तयारी सुरू
नवी मुंबई विमानतळावर सध्या एक धावपट्टी आहे. दुसरी धावपट्टी तयार करण्याचे काम सुरू आहे. तिसरी धावपट्टी तयार करण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. धावपट्टी आणि अन्य तांत्रिक बाबींचे नियोजन करण्याकरिता सल्लागार नेमण्यासाठी अनुभवी संस्थांकडून टेंडर मागवण्यात आले आहेत, असेही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या वेळी सांगितले.
- पहिल्या दिवशी नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांच्या विमानांचे लॅण्डिंग आणि टेकऑफ होणार आहे.
- नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर असलेल्या तरघर रेल्वे स्थानकापासून ते विमानतळापर्यंत जाण्यासाठी विमानतळ व्यवस्थापानाने वाहनांची व्यवस्था केली आहे. एनएमएमटी व्यवस्थापनही आपल्या बसेस विमानतळ मार्गावर चालवणार आहे.




























































