
‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय आज पनवेलमधील प्रवाशांना आला. कल्याण येथून पनवेलला आलेल्या एनएमएमटी बसचे ब्रेक अचानक फेल झाले. परंतु चालकाने प्रचंड प्रसंगावधान राखत ही बस रस्त्याऐवजी थेट रेल्वेच्या संरक्षक भिंतीवर नेऊन आदळवली. त्यामुळे बसस्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांचे प्राण बचावले.
नवी मुंबई महापालिकेची परिवहन बस (एमएच 43 एच 5334) कल्याण येथून पनवेल रेल्वे स्थानकाजवळ आली. रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी उतरले आणि ही बस परतीच्या प्रवासाला निघाली असता अचानक बसचे ब्रेक फेल झाले. जवळच बसस्टॉप होता. तिथे प्रवासी बसची आणि रिक्षाची वाट पाहात उभे होते. चालकाच्या हे लक्षात येताच त्याने बस पुढे न नेता स्टेअरिंग वळवले आणि धावती बस रेल्वे स्थानकाच्या संरक्षक भिंतीवर नेऊन आदळवली.
या दुर्घटनेत बसचे मोठे नुकसान झाले. बसमध्ये सुदैवाने प्रवासी नव्हते. परंतु चालकाने सतर्कतेने बस थांबवली नसती तर जवळच असलेल्या बसस्टॉपवर बसची आणि रिक्षा स्टॅण्डवर रिक्षाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना चिरडून ही बस पुढे गेली असती.
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात मोठी वर्दळ असते. मुंबईला जाणारे आणि मुंबईहून येणारे हजारो लोकल प्रवासी रेल्वे स्टेशन परिसरात बस किंवा रिक्षाने ये-जा करत असतात. याच ठिकाणी बसस्टॉपवर प्रवाशांची मोठी गर्दी असते.
एनएमएमटीच्या बस चालकाने जर प्रसंगावधान राखून बस रेल्वेच्या संरक्षक भिंतीवर धडकवली नसती तर नक्कीच माझा बळी गेला असता अशी प्रतिक्रिया बसस्टॉपवरील एका प्रवाशाने व्यक्त केली. गणपती बाप्पाची कृपा म्हणून आम्ही वाचलो असेही काही प्रवासी म्हणाले.