जलव्यवस्थापनात नवी मुंबईचा देशात डंका, स्थानिक स्वराज्य संस्था गटात प्रथम क्रमांक; मंगळवारी राष्ट्रपतींच्या हस्ते बहुमान

देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून विशेष लौकिक असलेल्या नवी मुंबईचा आता जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनात देशात डंका वाजला आहे. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणाऱ्या नवी मुंबईने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जल संसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य प्राधिकरणांना जल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. स्थानिक स्वराज्य गटातील प्रथम मानांकन नवी मुंबई महापालिकेला मिळाले आहे.

सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 साठी देशभरातून सुमारे 751 प्रस्ताव केंद्रीय जल मंत्रालयाकडे आले होते. या प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनामध्ये नवी मुंबई महापालिकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला. देशातील प्रत्येक स्तरावर जलसंरक्षण आणि जलसाक्षरतेला चालना देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश असून ‘जल समृद्ध हिंदुस्थान’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या पुरस्कारांसाठी देशभरातून 751 प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तपशीलवार अहवाल सादर केले. त्यानंतर स्वतंत्र निर्णायक मंडळाने पारदर्शक स्कोअर कार्ड पद्धतीने विजेत्यांची निवड केली. राष्ट्रीय पातळीवर शहराचा सन्मान होणार असल्याने नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीमध्ये
जल पुरस्कारांचे वितरण करण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने येत्या मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये विशेष समारंभाचे आयोजन केले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नवी मुंबई महापालिकेचा प्रथम पुरस्कार देऊन सन्मान करणार आहेत. यापूर्वीही नवी मुंबई महापालि केच्या जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापन उपक्रमांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कारामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.