
प्रदूषणमुक्त शहर ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरात सुमारे 100 चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय होऊन तीन वर्षे उलटले असले तरी प्रशासनाला एकही चार्जिंग स्टेशन उभे करता आलेले नाही. नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यानाच्या बाजूला फक्त चार्जिंग स्टेशनचा सांगाडा उभा करण्यात आला आहे. येथे अद्याप एकाही वाहनाचे चार्जिंग करण्यात आलेले नाही.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेत सुमारे दीडशे इलेक्ट्रीक बसेसचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात इलेक्ट्रीक वाहने घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चारचाकी इलेक्ट्रीक वाहनांबरोबर आता दुचाकी इलेक्ट्रीक वाहनेही मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर दिसू लागली आहेत. वाहनांच्या तुलनेत शहरात चार्जिंग स्टेशनची संख्या फार कमी आहे. त्यामुळे या वाहनचालकांना चार्जिंगसाठी आपली वाहने मुंबई आणि ठाणे शहरात घेऊन जावी लागत आहेत. नागरिकांचा इलेक्ट्रीक वाहनांकडे कल वाढावा यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरात 100 चार्जिंग स्टेशन उभी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी 50 चार्जिंग स्टेशन हे खासगी स्वरूपाचे असणार होते, तर 30 स्टेशन पालिका स्वतः उभी करणार होती.
प्रथम क्रमांकात अडथळा
स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराला देशात तिसरे मानांकन मिळाले आहे. जर पालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार शहरात 100 चार्जिंग स्टेशन सुरू झाले असते तर इलेक्ट्रीक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असती, याची दखल केंद्रीय यंत्रणेला घ्यावी लागली असती आणि स्वच्छ सर्वेक्षणात शहर प्रथम क्रमांकावर आले असते. मात्र या चार्जिंग स्टेशनकडे केलेले दुर्लक्ष हा प्रथम क्रमांक मिळण्यात मोठा अडथळा ठरला आहे, अशी खंत काँग्रेस जिल्हा सचिव सुधीर पवार यांनी व्यक्त केली आहे.