
नवी मुंबई शहरातील विकासकामे आणि प्रकल्पांऐवजी नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत नियम, पोटनियम, कलम, पोटकलम, श्रेयवाद, वैयक्तिक हेवेदावे यांच्यावरच चर्चा रंगू लागल्याने महासभा ही महाराडा सभा ठरली आहे. दोन महासभांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. मनमानी निर्णयामुळे विरोधकांनी थेट महापौरांना घेराव घातला. परिवहन समिती सदस्यांच्या निवडीमध्ये फक्त भाजपच्याच सदस्यांना स्थान देण्यात आल्यामुळे शिंदे गटाच्या नगरसेवकांनी सभात्यागही केला.
नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर महापौरपदी सुजाता पाटील आणि उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी महापौरांनी सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात होईल असे जाहीर केले होते. मात्र दोनच सभेत त्यांची ही घोषणा हवेत विरली आहे. आज झालेल्या महासभेत सुरुवातीच्या प्रस्तावावर जोरदार गोंधळ उडाला. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचे सदस्य उभे राहिले आणि एकमेकांच्या विरोधात हा प्रस्तावावर महासभेच्या पटलावर आल्यानंतरही मोठा गोंधळ उडाला होता.
घोषणाबाजी सुरू झाली. हा वाद शांत होत नाही तोच दुपारच्या सत्रात मागच्या बाकावरील सदस्य पुढे आले असा मुद्दा काही नगरसेवकांनी उपस्थित केला. हे सदस्य स्वकर्तृत्वावर आले असल्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त करीत असताना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक अंकुश कदम यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. काकाच्या कर्तृत्वावर पुतण्या पुढे आल्याचे विधान कदम यांनी केल्यानंतर भाजपचे नगरसेवक संतापले आणि भाजप आणि शिंदे गटात जोरदार खडाजंगी झाली.
- सभागृह नेते सागर नाईक यांनी पालिका अधिनियमांचा जोरदार गृहपाठ केला आहे. त्यामुळे त्यांनी काही बदल महापालिकेच्या कामकाजात सुचवले आहेत. या बदलांनाही शिंदे गटाच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे.
- प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांची चौकशी करण्यावर सत्ताधारी भाजपने विशेष भर दिला आहे. या चौकशीसाठी अनेक समित्यांची स्थापना करण्यात आली.
पहिल्याच महासभेत महापौरांना घेराव
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या परंपरेला बगल देऊन सभागृह नेते सागर नाईक यांनी काही बदल केले आहेत. त्यामुळे परिवहन समितीवर फक्त भाजपच्याच सदस्यांची निवड झाली आहे. हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आल्यानंतर शिंदे गटाने कडाडून विरोध करून महापौर सुजाता पाटील यांना घेराव घातला होता. त्यामुळे महापौरांना महासभेचे कामकाज तहकूब करावे लागले होते. कामकाज सुरू झाल्यानंतर शिंदे गटाने सभात्याग केला होता.
कामांऐवजी वादच गाजणार
नवी मुंबई महापालिकेत सध्या भाजप, शिंदे गट आणि प्रशासन असा तीनतिघाडा निर्माण झाला आहे. भाजपने प्रशासनाबरोबर नगरविकास खात्यालाही टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे महासभा विकासकार्माऐवजी वादानेच गाजणार आहे. २०१० ते २०१५ या कालावधीतही महासभेत अनेक वेळा राडे झाले होते. काही राडे थेट पोलीस ठाण्यापर्यंतही गेले होते. त्याचीच पुनरावृत्ती या टर्ममध्ये होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


























































