एनसीईआरटीने चुकीवरून घेतला ‘धडा’, न्यायपालिकेतील भ्रष्टाचारावरून मागितली बिनशर्त माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यायपालिकेतील भ्रष्टाचार आणि प्रलंबित प्रकरणे याची माहिती देणारा धडा 8 वीतील पुस्तकात प्रकाशित केल्याबद्दल राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ने मंगळवारी बिनशर्त माफी मागितली असून संबंधित पुस्तक मागे घेतले आहे, असेही एनसीईआरटीने स्पष्ट केले आहे. एनसीईआरटीने आज एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माफी मागितली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड – ग्रेड 8 (भाग 2)’ या पुस्तकात ‘आपल्या समाजात न्यायपालिकेची भूमिका’ या नावाचे प्रकरण चौथे समाविष्ट आहे. या प्रकरणाच्या प्रकाशनाबद्दल परिषदेला खेद आहे आणि आम्ही बिनशर्त माफी मागतो, तसेच ताबडतोब सर्व पुस्तके परत घेण्यात आली आहेत, असे म्हटले आहे. 25 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या नाराजीनंतर एनसीईआरटीच्या संबंधित पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. हे पुस्तक वेबसाइटवरूनही काढून टाकण्यात आले आहे. एनसीईआरटीचे अध्यक्ष दिनेश प्रसाद सकलानी यांनी या मुद्दय़ावर कोणतेही उत्तर दिले नव्हते. परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रकरण आता न्यायालयात विचाराधीन आहे. त्यामुळे ते या मुद्दय़ावर काहीही बोलणार नाहीत.

काय होते पुस्तकात?

8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी समाजशास्त्राचे नवीन पाठय़पुस्तक जारी केले होते. हे पुस्तक शैक्षणिक सत्र 2026-27 पासून शाळांमध्ये शिकवले जाणार होते. याचा पहिला भाग जुलै 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. ‘एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड पार्ट 2’ असे या धडय़ाचे नाव आहे. यात ‘द रोल ऑफ द ज्युडिशियरी इन अवर सोसायटी’ या प्रकरणांतर्गत ‘करप्शन इन द ज्युडिशियरी’ हा विषय जोडण्यात आला होता.