
विदर्भ दौऱ्यात संजय राऊत यांनी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर उभय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. नागपूरमधील काही नेत्यांमुळे आम्हाला जेलमध्ये जावे लागले, असा आरोप त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न करता केला.
विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, राज्यसभा खासदार संजय जी राऊत यांचे आज कोंढाळी येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उत्साहात स्वागत केले.@rautsanjay61 pic.twitter.com/BsTem11XRR
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 18, 2024
अनिल देशमुख हे सुमारे एक वर्षभर तुरुंगात होते. आपल्यालाही 100 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. हा काळ अत्यंत कठीण होता, असे संजय राऊत म्हणाले. आम्ही तडजोड करण्यास नकार दिल्याने आम्हाला तुरुंगात टाकण्यात आले. विचारांना विरोध करण्याचे धाडस दाखवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे सांगतानाच आजही आमचा लढा कायम आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
180 जागा जिंकणार
लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी असे सर्व्हे येतात. त्यावर विश्वास ठेवू नका. राज्यात महाविकास आघाडी 180 जागा जिंकणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विदर्भात तीन जागा लढवणार
लोकसभेत रामटेक आणि अमरावतीची शिवसेनेची जागा आम्ही काँग्रेसला दिली होती. विदर्भात रामटेक हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ आहे, नागपूरमधील एक जागा शिवसेना घेणार आहे आणि आणखी एका मतदारसंघातूनही आम्ही लढणार आहोत, असे ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांचा निवडणूक आयोगावर दबाव – अनिल देशमुख
चार राज्यांतील विधानसभा निवडणूक जाहीर होणे अपेक्षित होते, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने केवळ दोन राज्यांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. जाणीवपूर्वक निवडणूक प्रक्रिया लांबवण्याचा हा प्रयत्न असून सत्ताधाऱ्यांचा केंद्रीय निवडणूक आयोगावरही दबाव आहे का, असा सवाल यावेळी अनिल देशमुख यांनी केला.