गेले बापूसाहेब कुणीकडे? आमदार पठारे गायब; दोन्ही राष्ट्रवादीपुढे प्रश्न

महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा आणि सून भाजपमधून निवडणुक लढवत आहेत. मात्र, प्रभाग आणि मतदारसंघातून आमदार पठारे गायब झाले असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला आमदार पठारे गेले कुणीकडे असा सवाल उपस्थित झाला आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात बापूसाहेब पठारे यांचा मुलगा भाजपकडून खराडी–वाघोली प्रभाग क्रमांक 4  मधून, तर प्रभाग क्रमांक 3 विमाननगर लोहगावमधून पठारे यांची सून निवडणुक लढवित आहेत, तर पठारे यांचे भाचे संतोष भरणे यांच्या पत्नी तृप्ती संतोष भरणे यादेखील प्रभाग क्रमांक 4 मधून भाजपकडून लढत आहेत. त्यामुळे वडगाव शेरीत बापूसाहेब पठारे यांच्या पक्ष बदलू धोरणाची जोरदार चर्चा आहे. मात्र निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना पठारे गायब झाल्याने वडगाव शेरीत चर्चेचा विषय झाला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मतदान कोणाला करायचे सांगावे!

आमच्या युतीचे आमदार हरवले असून पुठे सापडले तर सांगा. ते कुठे आहेत ? आमदारांनी लोकांसमोर येऊन सांगावे मतदान कोणाला करायचे. पैसे आहेत म्हणून कोणत्याही पक्षातून निवडून येऊ शकतो आणि आम्ही जाऊ तिकडे लोक जातील, असा यांचा समज आहे. लोकांच्या भावनांशी खेळण्याचा काही अधिकार नाही. लोकांना पिण्याचे पाणी नाही. पालिकेचे पाणी यांच्या बावडीत येते. तेथून टँकरने सोसायटीत जाते, पण नळाला पाणी येत नाही. लोकांचे लाखो, करोडो रुपये यांच्याकडे जातात. पैसा येतो-जातो, परंतु स्वाभिमान कोणाचा विकत घेऊ शकत नाही. यापुढे लोकांच्या भावनांशी खेळ चालणार नाही. मतदार समजदार असून निवडणुकीत त्यांना धडा शिकवतील, असा इशारा आमदार माऊली कटके यांनी दिला असून या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.