कुटुंब म्हणून सगळे पवार एकत्रच राहावेत असे वाटते, विलीनीकरणाच्या प्रश्नावर जय पवार यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण हा राजकारणाचा भाग आहे. त्यावर मी जास्त संभाषण करणे मला योग्य वाटत नाही. कुटुंब म्हणून सगळे पवार एकत्र राहावेत असे मला वाटते, अशी भूमिका विलीनीकरणाच्या प्रश्नावर अजितदादा यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी आज मांडली.

बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची जय पवार यांनी पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पत्रकारांनी विचारले असता जय पवार म्हणाले, विलीनीकरणासंदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही. मी छोटा आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि बाकीचे ज्येष्ठ नेते यासंदर्भात ठरवतील. जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले तेव्हा पवार कुटुंब एकत्र होते. आजही आम्ही एकमेकांशी बोलतो. आम्ही कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावेत असे मला वाटते, असे म्हणत त्यानी विलीनीकरणाबाबत अधिक बोलणे टाळले.

विमान अपघाताचा अंतिम अहवाल आल्यावर बोलणार

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मी जे मुद्दे मांडणार होतो ते आमदार रोहित पवार यांनी आधीच मांडले आहेत. त्यामुळे मी पत्रकार परिषद घेतली नाही. विमान अपघाताचा अंतिम अहवाल आल्यावरच मी आता त्या विषयी बोलेन. विमान पंपनीचे मालक आणि पायलट कक्षात झोपले असल्याचा व्हिडीओ मी समाजमाध्यमांवर टाकला होता. बिल्डिंगला अपघात झाला तर इंजिनीअर नव्हे, मालकाला अटक होते. रेस्टॉरंटला आग लागली तर मालकाला अटक होते, मग इथे विमानाच्या मालकाला का अटक नाही, असा सवाल जय पवार यांनी केला.