दिल्ली गुन्हेगारांच्या ताब्यात, अरविंद केजरीवाल यांचा केंद्र सरकारवर निशाणा

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकून शनिवारी हल्ल्याचा प्रयत्न झाला.यावर केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या कायदा सुव्यवस्थेवर संताप व्यक्त केला आहे.

अरविंद केजरीवाल पत्रकार परिषदेत म्हणाले की, दिल्लीत दहशतीचे वातावरण असून येथील महिला भयभीत झाल्या आहेत. गँगस्टरच्या ताब्यात दिल्ली असून इथली कायदा सुव्यवस्था कोलमडलेली आहे. ते म्हणाले की, आज संपूर्ण दिल्लीत व्यावसायिकांना खंडणीसाठी फोन येत आहेत. खंडणीसाठी नकार दिल्यास दुसऱ्या दिवशी त्याच्या घराबाहेर किंवा दुकानाबाहेर गोळीबार होतो, ज्यामध्ये धमकी दिली जाते. पुढे केजरीवाल म्हणाले की, मी हे सर्व मुद्दे मांडत असताना शनिवारी पदयात्रेत माझ्यावर ज्वलंत पदार्थ फेकण्यात आला. शनिवारी माझ्या एका आमदाराला अटक झाली, खरंतर आमदारांनाही गुंडांचा त्रास होत आहे. त्यालाही गुंडांचे फोन आणि धमक्याही येत होत्या. 2023 मध्ये त्याने पोलिसात तक्रार केली आणि त्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गुंड कपिल सांगवान याने आमदाराला 30 ते 40 वेळा धमक्या दिल्या होत्या.

केजरीवाल म्हणाले, आपल्या कुटुंबाची माहिती देऊन आमदाराला धमकावल्याचे त्यांनी सांगितले. उलट पोलिसांनी आमदार नरेश बल्यान यांना 2023 च्या प्रकरणात अटक केली, मात्र त्यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट शनिवारी आमच्या आमदाराला अटक करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तुम्हाला एखाद्या गुंडाचा फोन आला आणि पोलिसांत तक्रार केल्यास तुम्हालाच अटक केली जाईल, असा संदेश दिला आहे. केजरीवाल यांनी अमित शहा यांना आव्हान देत, तुमच्यात हिंमत असेल तर गुंडांना अटक करून दाखवा. आमच्या आमदाराला अटक करून, आमच्यावर ज्वलनशील पदार्थ फेकून काय होणार असा सवाल केला आहे. शिवाय गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्ही वारंवार आवाज उठवत आहोत आणि यापुढेही तसेच करु. आज दिल्लीतील नागरिक, व्यापारी त्यांना खंडणीचा फोन कधी येईल या विचाराने घाबरलेले आहेत.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज मी टिळक नगर येथे जात असून तेथे दोन व्यावसायिकांना त्यांच्या दुकानाबाहेर गोळीबार करून धमकावण्यात आले. मला वाटले होते की, मी हे सर्व मुद्दे मांडले तर अमित शाह गुन्हेगारी थांबवतील आणि गुंडांवर कारवाई करतील, पण ते आमच्या मागे लागले आहेत असेही केजरीवाल म्हणाले.