
एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला गती देण्यात आली असून पुढील दोन महिन्यांत पुलाचा सांगाडा हटवण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन पूल उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गिकेवरील पूल उभारणीचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ‘महारेल’ने निश्चित केले आहे. पुलासाठी आवश्यक गर्डरपैकी 70 टक्के गर्डर नोएडा येथील फॅक्टरीमध्ये तयार केल्याची माहिती ‘महारेल’ने दिली.
ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून त्याजागी वरळी-शिवडी उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. यासाठी 12 सप्टेंबरपासून एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम हाती घेतले होते. हे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे पुलाचे पाडकाम रखडले होते. सध्या पश्चिम रेल्वेकडून रात्रीच्या वेळेस दोन-दोन तासांचे ब्लॉक दिले जात आहेत. त्या वेळेत जुन्या पुलाच्या लोखंडी सांगाडय़ाचे तुकडे-तुकडे करून ते हटवण्यात येत आहेत. जुना पूल हटवताना रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक आणि प्रवासी सुरक्षा सांभाळून काम करणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे पूल पाडकामाला विलंब होत आहे. मात्र पुढील दोन महिन्यांत पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून आवश्यक ते ब्लॉक मिळवून ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम पूर्ण केले जाईल. त्यानंतर नवीन पूल उभारणीला वेळ लागणार नाही
70 टक्के गर्डर नोएडा येथील फॅक्टरीमध्ये तयार केले आहेत. ते गर्डर मुंबईत आणून त्यांचे नव्या पुलासाठी लाँचिंग करण्यात येईल. सप्टेंबरपर्यंत नवीन पुलाची उभारणी करण्यात येईल, अशी माहिती ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैसवाल यांनी दिली.
मध्य रेल्वेवर 15 तासांच्या ब्लॉकसाठी मंजुरीची प्रतीक्षा
मध्य रेल्वे मार्गावरून रात्रीच्या सुमारास अनेक मेल-एक्स्प्रेसची ये-जा सुरू असते. त्या वाहतुकीचे नियोजन करून 15 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मोठय़ा ब्लॉकच्या अवधीत पुलाचे सर्व महाकाय अवशेष रेल्वे मार्गिकेवरून हटवले जाणार आहेत. सध्या 15 तासांच्या ब्लॉकसाठी रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा केली जात आहे. मंजुरीला विलंब होत असल्यामुळे ‘महारेल’ला दररोज व्रेनच्या भाडय़ापोटी लाखो रुपयांचा खर्च सोसावा लागत आहे.




























































