
>> सुजाता बाबर
लिटल रेड डॉट्सचा उलगडा हा आधुनिक खगोल भौतिकशास्त्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यामुळे प्रचलित सिद्धांतांना नव्याने आकार मिळत आहे आणि विश्वाच्या प्रारंभीच्या इतिहासाविषयी अधिक स्पष्ट चित्र समोर येत आहे.
विश्वाचा कितीही वेध घेतला तरी अजून कितीतरी मोठा खजिना लपून राहतोच. त्याचा शोध हा मानवी जीवनाबरोबरच संपेल. त्यात जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीसारख्या प्रचंड ताकदीच्या दुर्बिणी नवनवीन रहस्ये समोर आणत आहेतच. नुकतेच जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीने विश्वाच्या अगदी प्रारंभीच्या अवस्थेकडे पाहताना काही विलक्षण निरीक्षणे नोंदवली. या निरीक्षणांमध्ये आढळलेले तेजस्वी लाल बिंदू ‘लिटल रेड डॉट्स’ म्हणून ओळखले गेले. सुरुवातीला संशोधकांना वाटले की, हे प्रचंड प्रमाणात तारे निर्माण करणारे प्रदेश असावेत. विश्वरचना शास्त्रातील प्रचलित सिद्धांतांशी आणि महाविस्फोटानंतर अवघ्या काही करोड वर्षांत इतक्या मोठ्या आकाशगंगा किंवा प्रचंड वस्तुमानाची केंद्रे निर्माण होणे शक्य नाही. त्यामुळे या लाल बिंदूंचे स्वरूप काय असावे हा प्रश्न पडला. हे अतिवस्तुमान असलेल्या कृष्णविवरांमुळे निर्माण होणारे क्वासारसारखे तेजस्वी केंद्र असू शकतात. परंतु येथेही अडचण होती. पारंपरिक समजुतीनुसार कृष्णविवरे प्रथम प्रचंड ताऱयांच्या अंतपतनातून तयार होतात आणि नंतर दीर्घ काळात एकत्र येत अधिक मोठी बनतात. ही प्रक्रिया अब्जावधी वर्षे घेते. परंतु वेबने निरीक्षण केलेले लिटल रेड डॉट्स विश्व अत्यंत तरुण अवस्थेत आहेत. त्यामुळे इतक्या कमी काळात अतिवस्तुमान कृष्णविवरे तयार होणे अशक्यप्राय वाटत होते.
हार्वर्ड व स्मिथसोनियन संस्थेतील संशोधक फॅबिओ पाचुच्ची आणि त्यांच्या सहकाऱयांनी या गुढावर नवीन दृष्टिकोन मांडला. त्यांच्या मते, हे लिटल रेड डॉट्स प्रत्यक्षात ‘डायरेक्ट कोलॅप्सड ब्लॅक होल्स’ म्हणजेच थेट वायूरूप ढगांच्या अंतपतनातून तयार झालेली कृष्णविवरे असू शकतात. या कल्पनेत कृष्णविवरांची निर्मिती ताऱयांच्या टप्प्याविना थेट घनदाट हायड्रोजन वायूच्या ढगांपासून होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचे वस्तुमान मोठे असते आणि वाढीसाठी अब्जावधी वर्षांची आवश्यकता राहात नाही. यामुळे निरीक्षणे आणि सिद्धांत यांतील विसंगती दूर होऊ शकते.
संशोधकांनी रेडिएशन-फ्लक्स सिम्युलेशन वापरून अशा पडणाऱ्या कृष्णविवरांच्या प्रकाशीय गुणधर्मांचा अभ्यास केला. या सिम्युलेशनमध्ये कृष्णविवराभोवती पडणारा वायू आणि त्यातून निर्माण होणारे किरणोत्सर्ग आजूबाजूच्या वातावरणावर कसा परिणाम करतात याचे परीक्षण केले गेले. परिणामत अत्यंत घनदाट प्रदेश तयार होतो, जो उच्च-ऊर्जेचे विकिरण शोषून ते अतिनील व दृश्यमान प्रकाशात रूपांतरित करतो. विश्वाच्या प्रसरणामुळे हा प्रकाश अवरक्त पट्ट्यात सरकतो आणि तोच वेब दुर्बिणीला दिसतो. सिम्युलेशनमधून तयार केलेली कृत्रिम निरीक्षणे वेबने नोंदवलेल्या लिटल रेड डॉट्सशी आश्चर्यकारकरीत्या जुळली. या मॉडेलने लिटल रेड डॉट्सची अनेक वैशिष्ट्ये स्पष्ट केली. त्यांतून होणारे क्षीण क्ष-किरण उत्सर्जन, धातूंच्या आणि उच्च आयनीकरण रेषांची उपस्थिती, तारा-निर्मितीची चिन्हे नसणे, तसेच त्यांची अत्यंत संकुचित रचना ही सर्व लक्षणे थेट अंतपतनातून निर्माण झालेल्या कृष्णविवरांशी सुसंगत आढळली.
या निष्कर्षांचे महत्त्व व्यापक आहे. विश्वातील सर्वात प्राचीन कृष्णविवरे कशी तयार झाली, हा प्रश्न अनेक दशकांपासून अनुत्तरित होता. जर लिटल रेड डॉट्स खरोखरच थेट अंतपतन कृष्णविवरे असतील, तर याचा अर्थ विश्वाच्या अगदी सुरुवातीच्या काळातच प्रचंड वस्तुमानाची बीजे तयार झाली असावी. त्यामुळे पुढील आकाशगंगा निर्मिती आणि संरचनात्मक उक्रांती अधिक वेगाने घडली असावी. जेम्स वेब दुर्बिणीने या प्रक्रियेचे थेट निरीक्षण करण्याची अभूतपूर्व संधी उपलब्ध करून दिली आहे.
एकूणच, लिटल रेड डॉट्सचा उलगडा हा आधुनिक खगोल भौतिकशास्त्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यामुळे प्रचलित सिद्धांतांना नव्याने आकार मिळत आहे आणि विश्वाच्या प्रारंभीच्या इतिहासाविषयी अधिक स्पष्ट चित्र समोर येत आहे. जेम्स वेब दुर्बिणीने अपेक्षेप्रमाणेच केवळ दूरवर पाहिले नाही, तर आपल्या विश्वसमजालाच नव्याने घडवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)

























































