लठ्ठ, मधुमेहींना अमेरिका प्रवेश कठीण, ट्रम्प सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे – टॅरिफ एच1बी व्हिसानंतर जगाला पुन्हा धक्का

कर्करोग, मधुमेह, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असलेल्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणे आणखी कठीण होणार आहे. अमेरिकेत स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार जुनाट किंवा गंभीर आजार असलेल्यांना व्हिसा किंवा ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते.

ट्रम्प प्रशासनाने ही नवी नियमावली जगभरातील अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासांना पाठविली आहे. अमेरिकेत स्थलांतरित होण्यासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना असलेल्या आजारांची माहिती घेण्याचे निर्देश अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिले आहेत. तसेच अर्जदारांच्या आर्थिक स्थितीचीदेखील माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अर्जदार उपचारांचा खर्च स्वतः उचलू शकतो का, याची शहानिशा करण्यात येणार आहे. अर्जदाराची मुले तसेच वृद्ध आई-वडिलांच्या आरोग्याची स्थितीही जाणून घेतली जाणार आहे. असे लोक अमेरिकेत स्थलांतरित झाल्यास त्यांच्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. हा अतिरिक्त आर्थिक भार अमेरिकेवर पडू नये या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणते आजार ठरणार अडचणीचे?

नव्या नियमावलीत काही आजारांची यादी दिली आहे. त्यात मधुमेह, कर्करोग, हृदयरोग, श्वसनविकार, मज्जासंस्था, पचनसंस्था तसेच रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा समावेश आहे. याशिवाय लठ्ठपणा असला तरी अर्ज नाकारला जाऊ शकतो. अशा व्यक्तींना दमा, उच्च रक्तदाब किंवा इतर व्याधी असू किंवा उद्भवू शकतात. त्यामुळे त्याबाबतही विचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवी नियमावली का?

महासत्ता असलेल्या अमेरिकेवर मोठे कर्ज आहे. त्यातच सध्या तेथे सर्वात मोठे शटडाऊन सुरू आहे. त्यामुळे परदेशी लोकांच्या उपचारासाठी आपला पैसा खर्च होऊ नये, हे यामागील मोठे कारण आहे. अमेरिकेच्या सरकारी सेवांवर ओझे ठरू शकतील अशा लोकांना रोखणे हा यामागचा हेतू आहे.