दलालांच्या घुसखोरीला चाप बसणार, रेल्वेच्या तिकीट बुकिंगचे 1 ऑक्टोबरपासून नवे नियम

रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल केले जाणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. आरक्षण प्रणाली सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये आधार व्हेरिफिकेशन केलेल्या युजर्सनाच ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येणार आहे. हा नवीन नियम आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि मोबाईल ऍपसाठी लागू असणार आहे.

रेल्वे प्रशासनाने 1 जुलैपासून तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन आवश्यक केले होते. त्यानंतर आता रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर सामान्य प्रवाशांना तिकीट बुक करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही एजंट तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीने तिकीट बुक करतात. त्याचा सामान्य युजर्स असलेल्या प्रवाशांना फटका बसतो. त्यांना ऑनलाईन तिकीट बुक करता येत नसल्याचे विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने ऑनलाईन तिकिट बुकिंगच्या बाबतीत येत्या 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑनलाईन तिकीट बुकींगमधील दलालांच्या घुसखोरीला चाप बसणार आहे.