
मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या फिन अॅलनने सलामीच्या सामन्यात ऐतिहासिक खेळी केली. त्याने अवघ्या 34 चेंडूंत झंझावाती शतक ठोकताना 13 षटकार आणि 3 चौकारांची बरसात केली. एवढेच नव्हे तर पुढील 17 चेंडूंत आणखी 51 धावांची भर घालत 51 चेंडूंत 151 धावा फटकावल्या. अॅलनने आपल्या खेळीत 19 षटकारांसह 5 चौकार लगावत अवघ्या 24 चेंडूंत 130 धावा काढल्या.
एमएलसी स्पर्धेतील या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघाने वॉशिंग्टन फ्रीडमचा 123 धावांनी धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. फिन अॅलनने केलेल्या 151 धावांच्या जोरावर सॅन प्रान्सिस्को युनिकॉर्नने वॉशिंग्टन फ्रीडमसमोर 270 धावांचं आव्हान उभं केलं होतं. मात्र वॉशिंग्टन फ्रीडमला 13.1 ओव्हरमध्ये 146 धावांत गुंडाळले.
अॅलनची विश्वविक्रमी खेळी
अॅलनने 34 चेंडूंत शतक पूर्ण करताना वैभव सूर्यवंशी आणि रोहित शर्मा या दोघांना मागे टाकले. वैभव आणि रोहित या दोघांनी 35 चेंडूंत शतक झळकावले होते. तसेच अॅलनने या स्पर्धेत निकोलस पूरनच्या नावावर असलेला 40 चेंडूंतील वेगवान शतकाचा विक्रमही मोडीत काढला. तसेच अॅलनने 19 षटकारांसह ख्रिस गेललाही मागे टाकले. एका टी-20 सामन्यात सर्वाधिक 18षटकारांचा गेलचा विश्वविक्रम अॅलनने 19 षटकार ठोकत मोडला. गेलने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये नाबाद 146 धावांच्या खेळीदरम्यान 18 षटकार मारले होते, मात्र त्याला गेलच्या 30 चेंडूंतील शतकाचा विश्वविक्रम मोडता आला नाही.