बिहार निवडणुकीत AI Generated व्हिडिओ वापरता येणार नाही, निवडणूक आयोगाचे आदेश

भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकांदरम्यान Artificial Intelligence ने तयार केलेल्या व्हिडिओंच्या वापरावर बंदी घातली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही उमेदवाराला आपल्या विरोधकांविरुद्ध प्रचार करण्यासाठी AI व्हिडिओ कोणत्याही स्वरूपात वापरण्याची परवानगी राहणार नाही.

आयोगाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की कोणताही उमेदवार आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध प्रचारासाठी कोणत्याही प्रकारचा AI व्हिडिओ वापरू शकणार नाही,” तसेच हे निर्देश सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक असतील

बिहार विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या निवडणुका दोन टप्प्यांत 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार असून, निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर केले जातील. निवडणूक आयोगाने सांगितले की, या बंदीचा उद्देश राजकीय प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर टाळणे आणि निवडणुका मुक्त व निष्पक्ष ठेवणे हा आहे.

निवडणूक प्रक्रियेची सुसंगती आणि प्रामाणिकपणा राखण्याच्या दृष्टीने, आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर माहिती विकृत करणाऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या AI साधनांचा वापर टाळावा.

तसेच, सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते, उमेदवार आणि अधिकृत प्रचारक यांनी जर प्रचारासाठी AI-निर्मित किंवा सिंथेटिक सामग्रीचा वापर केला, तर त्या सामग्रीवर स्पष्टपणे AI-generated, digitally manipulated किंवा synthetic content” असे लेबल लावणे बंधनकारक असेल.

याशिवाय, आयोगाने सोशल मीडियावरील पोस्ट्सचे कठोर निरीक्षण सुरू केले आहे, जेणेकरून निवडणूक वातावरण दूषित होणार नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे, आणि या नियमांचे कोणतेही उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.