
केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी सध्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तिला 16 जुलै रोजी येमेनमध्ये फाशी देण्यात येणार होती. मात्र, आता तिची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्र सरकार निमिषा प्रियाला फाशीपासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. प्रकरणाचे गांभीर्य पाहता तिला वाचवणे कठीण असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता तिची फाशी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
येमेनच्या न्यायालयाने निमिषा प्रियाला एका खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली आहे. ती 2017 पासून येमेनच्या तुरुंगात आहे. निमिषा ही येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीची हत्या केल्याप्रकरणी दोषी आढळली होती. तिचा पासपोर्ट त्याच्याकडे जमा होता, तो घेण्यासाठी तिने महदीला भूल देण्याचे इंजेक्शन दिल्याचा आरोप तिच्यावर होता. परंतु या इंजेक्शन्सच्या ओव्हरडोसमुळे महदीचा मृत्यू झाला.
केरळमधील पलक्कड येथील रहिवासी नर्स निमिषा गेल्या एक दशकापासून तिच्या पती आणि मुलीसह येमेनमध्ये काम करत होती. 2016 मध्ये येमेनमध्ये झालेल्या गृहयुद्धामुळे देशाबाहेर प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु त्यापूर्वी, तिचा पती आणि मुलगी 2014 मध्ये हिंदुस्थानात परतले होते. मात्र, निमिषा परत येऊ शकली नाही. यानंतर, जुलै 2017 मध्ये निमिषावर एका येमेनी नागरिकाची हत्या केल्याचा आरोप होता. त्यामुळे 7 मार्च 2018 रोजी येमेनमधील न्यायालयाने निमिषा यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
येमेनमध्ये शरिया कायदा लागू आहे. या कायद्यानुसार, हत्याप्रकरणी मृत्युदंड दिला जातो. रक्तपैसा ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये खून केल्याबद्दल दोषी ठरलेल्या व्यक्तीला माफ केले जाऊ शकते. मात्र, त्याने मृताच्या कुटुंबाला भरपाई म्हणून मोठी रक्कम द्यावी लागते. ही रक्कम मृताच्या नातेवाईकांशी झालेल्या करारानुसार ठरवली जाते. येमेनमध्ये निमिषाला मृत्युदंडाची शिक्षा झाल्यापासून रक्तपैसा देऊन तिची सुटका करण्याची चर्चा सुरू होती. तसेच तिची फाशी टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत होते. आता तिची फाशी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.