
>> नितीन वैद्य
वाचन आयुष्याच्या मुख्य प्रवाहात विरघळताना जे जे अनुभवलं, दिसलं आणि उरलं ते सारं मांडणारं ‘वाचून उरणारी पुस्तकं’ हे लेखक नीतिन वैद्य यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. यानिमित्त लेखकाचे हे मनोगत.
‘वाचून उरणारी पुस्तकं’ ही एकाअर्थी उपोद्घातापासून उपसंहारापर्यंत पसरलेली माझी वाचनकथा आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर मित्रांसारखी आयुष्यात येतात पुस्तकं आणि चोख मैत्र निभावतात इथपासून ‘पुढे काय असेल छापील पुस्तकाचं भवितव्य? आणि त्यातून उलगडणाऱ्या मानवी सर्जनाचं स्थान?’ या काहीशा भयाकुल शंकेपर्यंतच्या या वाटेवरच्या या पुस्तकात असंख्य पुस्तकं पसरलेली आहेत. त्यांना जोडणारी काही सूत्रं नकळत समोर येतात, ती अशी –
कविता में से कविता निकलती है…
पुस्तकात ‘जनसत्ता’चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार ओम थानवी यांचा पाकिस्तानातल्या सिंधमधल्या लाडकाणा इथला ‘मोहेंजोदडो’च्या अवशेषांना भेट दिल्याचा अनुभव आहे. या उद्ध्वस्त अवशेषांतून तत्कालीन ग्रामरचना पाहताना लक्षात येते, घरं हमरस्त्याकडे पाठ फिरवून उभी आहेत, त्यात प्रवेश करायचा तर मागच्या छोटय़ा गल्ल्यांमधून जावे लागते. थानवींना आठवते, चंदिगडची रचनाही काहीशी अशीच आहे, सेक्टरमधली घरं मागच्या छोटय़ा बोळात उघडतात. वाटते, ‘ला कार्बुजिये (ज्याने चंदिगडची रचना केली) इथं आला असेल? सुना है, कवितामेंसे कविता निकलती है…’ एक पुस्तक तुम्हाला अनेक समांतर वाटा दाखवते. एखाद्या विषयावरचं पुस्तक वाचताना आवडत जातं तशी त्याच विषयासंदर्भातली, कदाचित थोडा वेगळा दृष्टिकोन दाखवणारी, वेगळी मांडणी करणारी पुस्तकं हाकारल्यावर पाखरांनी यावं तशी स्मृतींमध्ये गोळा होतात. वाटले, किताबमेंसे किताबें निकलती है… हे गुणाकारी पद्धतीने विस्तारणारे वाचन तुम्हाला जगण्याच्या खोल सहानुभवी, स्वीकारशील समजुतीकडे घेऊन जाते असा विश्वास या प्रवासात दृढ होत गेला.
कारण पुस्तक आयुष्यापेक्षा महत्त्वाचं आहे… पत्रकार इर्शाद मंजी यांच्या इस्लामसंबंधातील पुस्तकाची तपशीलात्मक नोंद या पुस्तकात आहे. त्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक रश्दींची मुलाखत घेतली त्याचा संदर्भ आहे. रश्दी तिला लिहीत राहा असा सल्ला देतात. सलमानना स्वतला धमक्यांमुळे दीर्घकाळ अज्ञातवासात राहावे लागले, घरनाती विस्कटली या काळात. तरी बाहेर आल्यावर एका समारंभात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. मोठय़ा उपचारानंतर जीव वाचला तो एक डोळा कायमसाठी गमावून. इर्शाद पत्रकार, संघर्षशील विद्रोही, घोषित समलिंगी. ती विचारते, ‘तुम्हाला लिहिण्यातूनच इतकं काय काय सोसावं लागलं, तरी मला असा सल्ला का देताय?’ रश्दी तत्काळ म्हणाले, ‘कारण पुस्तक आयुष्यापेक्षा महत्त्वाचं आहे.’ काय कारण असेल यामागे? वाटले, वैयक्तिक आयुष्य अनमोल पण आपले एकटय़ाचे असते. पण पुस्तकं अशी अगणित आयुष्य अर्थपूर्णतेच्या, सकारात्मकतेच्या, सहानुभवाच्या मार्गावर आणू शकण्याची क्षमता राखून असतात. या पुस्तकांत अशा अनेक पुस्तकांचे संदर्भ आहेत. ज्ञानपीठ विजेते कवी केदारनाथ सिंह यांच्या या पुस्तकात आलेल्या एका कवितेतल्या काही ओळी आहेत,
…परंतु प्रिय वाचक
एका कवी…
जास्तीत जास्तीत जास्त हेच तर करत असतो
की लोकांमध्ये
अगदी चीज वस्तूंमध्येदेखील
नेहमी टिकून राहावी
पुनपुन्हा जन्म घेण्याची इच्छा…
(अनु. बलवंत जेऊरकर)
पुस्तकं नकळत तुमच्या जगण्यात शिरकाव करत जातात तसे वाचन आयुष्याच्या मुख्य प्रवाहात नकळत विरघळून जाते आणि उत्तरोत्तर विकसित होत आपल्या रोजच्या औपचारिक जगण्यात मौलिक बदल घडवते.
पुस्तकांच्या मैत्रभावाचा अनुभव सार्वत्रिक आहे तसा आत्यंतिक खासगीही. कुणाच्या पोटी, कुठल्या परिस्थितीत, देशकाळप्रांतात जन्म व्हावा हे तुम्हाला ठरवता, निवडता येत नाही, पण पुस्तकं निवडता येतात, मित्रांसारखी. ती तुम्हाला जगण्यातल्या असंख्य शक्यतांनी खचलेल्या आकाशाखाली उभं करतात तशीच वैयक्तिक नातेसंबंधांपासून सामाजिक प्रश्नांपर्यंत अगणित शक्यतांच्या तिठय़ावरही उभी करतात. परात्पर का होईना अशा विविधानुभवाने तुमची जाणीव रूंद, अधिक स्वीकारशील, सहानुभवी होत जाते. यातून येते ती शाहणीव प्रत्यक्षायुष्यातल्या अशा तिठ्यांवर निर्णय घ्यायला मदत करते. वाचून झाल्यावरही पुस्तकं अशी उरतात, आयुष्य व्यापून राहतात. हे पुस्तक ही अशा पुस्तकांच्या वाचनानुभवाची गोष्ट आहे.































































