कन्फर्म तिकिटावरील तारीख बदलता येणार, कॅन्सलेशन चार्जेसही लागणार नाहीत; रेल्वेचा नवा नियम लवकरच

रेल्वे एक मोठा बदल करणार आहे. या बदलानंतर प्रवाशांना कन्फर्म रेल्वे तिकिटाची तारीख बदलण्याची संधी मिळणार आहे. एवढेच नव्हे तर तिकिटाची तारीख बदलल्यावर कोणतेही कॅन्सलेशन चार्जेसही भरावे लागणार नाहीत.

आतापर्यंत अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. जर प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाच्या तारखा बदलल्या की, आधी तिकिटे रद्द करावी लागतात आणि नंतर नवीन तारखेसाठी पुन्हा बुकिंग करावे लागते. यामुळे नवीन बुकिंगचा खर्च वाढतो, तसेच जुन्या तिकिटावर कॅन्सलेशन शुल्कदेखील आकारले जाते. अनेकदा प्रवास पुढे ढकलल्यामुळे प्रवाशांना दुहेरी नुकसान सहन करावे लागते. आता प्रवाशांना असा कोणताही भुर्दंड बसणार नाही. नव्या सुविधेंतर्गत आता कन्फर्म तिकिटांची प्रवास तारीख ऑनलाइन मोफत बदलता येईल. अशा स्थितीत प्रवाशांना आता त्यांची तिकिटे रद्द करण्याची आवश्यकता नाही, ज्यामुळे रद्दीकरण शुल्काचा त्रास कमी होईल. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी आयआरसीटीसीसह इतर एजन्सींना यावर काम जलद करण्याचे निर्देश दिले. सध्या ही सुविधा फक्त ऑफलाइन तिकिटांसाठी उपलब्ध आहे, पण लवकरच ऑनलाइन प्रवाशांसाठीदेखील लागू केली जाईल.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन सुविधा जानेवारी 2026 पासून लागू होईल?

सध्या तिकीट रद्द केले की शुल्क आकारले जाते. द्वितीय श्रेणीच्या तिकिटांवर कमीत कमी 60 रुपये. एसी थ्री टायर व चेअर कारसाठी रुपये 180 आणि जीएसटी एवढे शुल्क आकारले जाते. जर प्रवासाच्या  48 तास आधी तिकीट रद्द केले की, 25 टक्के आणि 48 ते 12 तासांच्या आत रद्द केले की, 50 टक्के शुल्क आकारले जाते.