
संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव आज गदारोळातच फेटाळण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रस्तावावर सविस्तर चर्चा टाळून केवळ आवाजी मतदानाच्या जोरावर तो निकालात काढल्याने सरकारवर नामुष्की ओढवल्याची टीका आता विरोधी पक्षांकडून केली जात आहे.
सभागृहात नेमकं काय घडलं?
लोकसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडला होता. यावर नियमानुसार सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र आज कामकाज सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. या गदारोळाचा फायदा घेत, कोणतीही ठोस अशी चर्चा न घडवता पीठासीन अध्यक्षांनी आवाजी मतदान घेण्याची प्रक्रिया पार पाडली. सत्ताधारी बाकावरून हो, असा मोठा आवाज आल्याने प्रस्ताव फेटाळल्याचे घोषित करण्यात आले.
यावर बोलताना आरजेडी खासदार अभय कुमार सिन्हा म्हणाले की, विरोधी सदस्यांना अनेकदा असे वाटायचे की त्यांना अध्यक्षांकडून पूर्ण संरक्षण मिळत नाही. ते म्हणाले, “मला हे सांगताना दुःख होत आहे की, गेल्या काही काळापासून अध्यक्षपद हे सभागृहाच्या स्वातंत्र्याचे नव्हे तर सत्ताधारी पक्षाच्या जुलूमशाहीचे प्रतीक बनले आहे.”
























































