
फिनलंडमधल्या शिक्षणपद्धतीचे जगभरात कौतुक केले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फिनलंडमध्ये विद्यार्थ्यांना 16 वर्षांपर्यंत कोणतीही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा द्यावी लागत नाही. दुसरीकडे हिंदुस्थान सारख्या देशात दहावी आणि बारावीला बोर्ड परीक्षा अनिवार्य आहे. फिनलंडमध्ये फक्त उच्च माध्यमिक शिक्षण (इयत्ता 10 वी ते 12 वी) पूर्ण केल्यानंतर ‘मॅट्रिक्युलेशन परीक्षा’ घेतली जाते, जी कॉलेज किंवा विद्यापीठ प्रवेशासाठी असते. फिनलंडमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यांकन त्यांना मिळालेल्या अभिप्राय आणि दिलेल्या प्रोत्साहनाच्या माध्यमातून केले जाते.
फिनलंडमध्ये औपचारिक शिक्षणाची सुरुवात मुलांच्या 7 व्या वर्षी होते. त्याआधी 0 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी ‘अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर’ (ECEC) प्रणाली राबवली जाते. ही प्रणाली स्थानिक प्रशासनाद्वारे चालवली जाते आणि मुलांना परीक्षेच्या तयारीऐवजी त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. या सेवेचा खर्च कुटुंबाच्या उत्पन्नावर आणि मुलांची संख्येवर अवलंबून असतो.
या नऊ वर्षांत मुलांना लागणारी जीवनकौशल्ये आणि सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. बहुतांश मुलं आपल्या घराजवळील शाळांमध्ये शिकतात, जरी काही अटींसह इतर शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संधीही असते.
प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थी सामान्य शिक्षण किंवा व्यवसायिक प्रशिक्षण यामधून एक पर्याय निवडू शकतात. हे दोन्ही अभ्यासक्रम साधारणपणे 3 वर्षांचे असतात आणि उच्च शिक्षणासाठी पात्र असतात. व्यवसायिक प्रशिक्षण विशेषतः तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि वाहतूक यांसारख्या क्षेत्रांमध्ये लोकप्रिय असून ४० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हाच पर्याय निवडतात.
सैद्धांतिक विषयांमधील गुणांवर मुलांना प्रवेश दिला जातो. तर काही अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश किंवा योग्यतेच्या चाचण्यांचा वापर केला जातो. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच कठीण राष्ट्रीय परीक्षांनी विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याऐवजी, फिनलंडमध्ये मुलांच्या वैयक्तिक विकासावर आणि जीवनकौशल्यांवर भर देण्याचा प्रयत्न केला जातो.