पंचनाम्यांचा अहवाल आल्याशिवाय काही नाही! कृषिमंत्री भरणे यांनी माढ्यातील पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली

‘पंचनामे झाल्याशिवाय आणि त्यांचा अहवाल आल्याशिवाय काही करता येणार नाही,’ असे सांगत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली. काही मिनिटांच्या पाहणी दौऱ्यात कृषिमंत्र्यांवर संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी त्यांनी फोनवरून जिल्हाधिकाऱ्यांना मदतीबाबत दम देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, आज कृषिमंत्र्यांनी ‘अहवाल आल्याशिवाय काही करता येणार नाही,’ असे सांगितल्यामुळे मदतीबाबत सरकारच गोंधळात असल्याचे दिसून आले. ‘फक्त घोषणांचा महापूर आणि मदतीचा दुष्काळ’ अशी अवस्था माढा तालुक्यातील पूरबाधित शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहे.

कृषिमंत्री भरणे आज माढा तालुक्यातील उंदरगाव येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी एकरी 50 हजार रुपयांच्या मदतीबाबत काहीच भाष्य केले नाही. दिवाळीपूर्वीच मदत केली जाईल,’ अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आमदार अभिजित पाटील, नगराध्यक्षा मीनल साठे, दादासाहेब साठे, उमेश पाटील, माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, अमोल चव्हाण  आदी यावेळी उपस्थित होते.

अवघ्या काही मिनिटांत उरकला दौरा

कृषिमंत्री भरणे यांचा पूरग्रस्त पाहणीचा प्रस्तावित दौरा रद्द होता होता कसातरी पार पडला. अवघ्या काही मिनिटांत त्यांनी उंदरगाव नदीक्षेत्रात पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड असंतोषाला-उद्रेकला सामोरे जावे लागले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारवर रोष व्यक्त केला. 10 दिवस उलटून गेले, तरी सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नाही, चाऱ्याअभावी जनावरांवर मरण्याची वेळ आलेली असताना नेतेमंडळी दौरे उरकण्यात मश्गुल आहेत, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. माढा तालुक्यातील वाकाव, उंदरगाव, केवड, खैराव, राहुलनगर, दारफळ या भागांत भयानक नुकसान झाले आहे.

एकही अधिकारी सोबत नाही

कृषिमंत्री भरणे यांचा दौरा असताना जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांपैकी कोणीच सोबत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा संताप पाहून प्रसारमाध्यमांसमोर कृषिमंत्री भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून, ‘फक्त टेबलवर बसून काम करू नका,’ असा दम देऊन नागरिकांचा संताप कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही नागरिक आणि शेतकरी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त करीत होते.

सदाभाऊ खोत यांनाही शेतकऱ्यांनी पिटाळले

‘रयत क्रांती’चे सदाभाऊ खोत यांनीही आज सकाळी माढा तालुक्यातील उंदरगाव येथे पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांना पिटाळून लावले.

‘तुम्ही येथून खासदारकीला उभे होता. त्यानंतर या भागाकडे तुम्ही फिरकलातसुद्धा नाही. खासदारकीसाठी या गावाने तुम्हाला पैसे दिले, नोटांच्या माळा तुमच्या गळय़ात घातल्या. आता या भागातील शेतकरी अडचणीत असताना गेल्या 10 दिवसांपासून तुम्ही इकडे फिरकलात नाही. 10 दिवस कुठे होता?’ या प्रश्नांच्या भडिमाराने सदाभाऊ खोत यांना येथून काढता पाय घ्यावा लागला.