
अमेरिकन मुलगा दत्तक घेणे हा काही मूलभूत अधिकार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने एका दत्तक नोंदणीस नकार दिला.
पुणे येथील अब्दुल कादीर लोखंडवाला व त्यांच्या पत्नीने ही याचिका केली होती. अमेरिकेतील नातलगांकडून त्यांनी मुलगा दत्तक घेतला. मात्र त्याची ऑनलाईन नोंदणी करण्यास केंद्रीय दत्तक संस्थेने नकार दिला. ही नोंदणी करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्रीय संस्थेला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
बाळाची काळजी घेण्याची नितांत गरज असेल किंवा काही कायदेशीर अडचणी असतील तर बाळ दत्तक घेता येते. अमेरिकन मुलाला दत्तक घेताना अशी कोणतीच परिस्थिती नाही. त्यामुळे नात्यातील मुले दत्तक घेतले जात असले तरी हिंदुस्थानातील कायदा या दत्तक प्रक्रियेला परवानगी देत नाही, असे नमूद करत न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
नागरिकत्वासाठी अर्ज करा
या मुलाला हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळावे यासाठी आधी अर्ज करा. त्यानंतर नियमानुसार दत्तक प्रक्रिया करा, असा पर्याय केंद्रीय दत्तक संस्थेने दिला आहे. परिणामी आम्ही विशेषाधिकारात दत्तक नोंदणीचे आदेश देण्यापेक्षा याचिकाकर्त्यांनी या पर्यायाचा विचार करावा, असा सल्ला न्यायालयाने दिला.