
राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासाठी पैसे नाही. दुसरीकडे पैशासाठी सोळाव्या वित्त आयोगाकडे महायुती सरकारने पदर पसरला आहे. पण तरीही महायुतीच्या तीन लाडक्या मंत्र्यांच्या आलिशान इनोव्हा कारच्या खरेदीसाठी कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. राज्यपालांसाठीही चार मोटारी घेण्यात येत आहेत.
तिजोरीत खडखडाट असला तरी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे आणि शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर या तीन लाडक्या मंत्र्यांसह शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजित सिंह देओल यांच्यासाठी एक त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाच्या कार्यालयीन वापरासाठी अशा एकूण सहा इनोव्हा क्रिस्टा कार खरेदी करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. ‘मेसर्स मधुबन मोटर्स प्रा. लि.’ या कंपनीकडून सहा इनोव्हा क्रिस्टा 7 सीटर या आलिशान गाडय़ा खरेदी करण्यात येणार आहेत. या प्रत्येक गाडीसाठी सुमारे 25 लाख 68 लाख रुपये मोजण्यात येणार आहेत.
कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांप्रमाणेच राज्यपालांच्या ताफ्यासाठीही चार नवीन वाहने खरेदी केली जाणार आहेत. ही वाहने टोयोटा हायक्रॉस व्हीएक्सओ (सीटर) (पेट्रोल) (3 वाहने) आणि टोयोटा कॅमरी सीझेड (ऑटो) बीएस 6, एक 2023 एमएफजी हायब्रिड पेट्रोल कार अशा चार वाहनांच्या खरेदीसाठी एकूण 1 कोटी 31 लाख रुपयांहून अधिक पैसे खर्च करण्यात येणार आहेत. राज्यपालांच्या ताफ्यासाठी एकूण 8 वाहने खरेदी करण्यास मान्यता देण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे म्हणणे आहे. त्यापैकी फक्त 4 नवीन वाहने खरेदी केली जात आहेत.
राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या खराब आहे. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिष्टमंडळाने अलीकडेच मुंबई दौरा केला. सरकारकडे निधी नसल्यामुळे महायुती सरकारने वित्त आयोगाकडे 1 लाख 28 हजार कोटी रुपये मागितले आहेत, तर दुसरीकडे मंत्री, सचिव आणि शालेय शिक्षण विभागाच्या आलिशान मोटारींसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च होत आहे. या खरेदीवरून सरकार अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.