
हॉलीवूडमधील प्रतिष्ठेचा मानला जाणारा आॅस्कर पुरस्कार सोहळा यंदाही काही हलक्या-फुलक्या राजकीय टोमण्यांमुळे चर्चेत राहिला. अमेरिकन कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट जिमी किमेल यांनी आॅस्करच्या मंचावरून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या विनोदी शैलीत चांगलाच टोला लगावला आहे. सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार जाहीर करताना किमेल म्हणाले की, “काही माहितीपट मोठ्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात, तर काही फक्त व्हाईट हाऊसमध्ये फिरत बूट ट्राय करण्याबद्दल असतात.” त्यानंतर त्यांनी विनोदाने म्हटले की, ट्रम्प कदाचित रागावतील कारण त्यांच्या पत्नीवर आधारित चित्रपटाला ऑस्कर नामांकनच मिळाले नाही.
Jimmy Kimmel takes swipe at Donald Trump at the #Oscars: “Oh man, is he going to be mad that his wife wasn’t nominated for this” pic.twitter.com/h3WUfWAFy7
— Deadline (@DEADLINE) March 16, 2026
हा टोमणा मेलानिया ट्रम्प यांच्या आयुष्यावर आधारित ‘मेलानिया’ या चित्रपटावर होता. या चित्रपटात फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही प्रसंग दाखवण्यात आले होते. मात्र या चित्रपटाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले नाही. किमेल यांच्या या विनोदावर सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये हास्याची लाट उसळली. काही वेळातच हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली.
दरम्यान, ट्रम्प समर्थकांनी या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली. काहींनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना किमेल यांनी ऑस्करच्या मंचावरून राजकीय टोमणे मारू नयेत, अशी टीका केली. ‘मेलानिया’ हा चित्रपट अमेरिकेतील राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला होता. मात्र समीक्षकांकडून त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि ऑस्करच्या शर्यतीतही तो मागे पडला. यामुळे ऑस्करच्या मंचावर झालेला किमेल यांचा विनोद हा यंदाच्या सोहळ्यातील सर्वाधिक चर्चेतील क्षणांपैकी एक ठरला.
























































