मुंबईत आजही अॅलर्ट पाऊस काही ऐकेना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान विभाग दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा अंदाज व्यक्त करत आहे. उद्याचाही अॅलर्ट देण्यात आला आहे. मात्र पाऊस काही ऐकायला तयार नाही.आज दिवसभर समुद्रकिनारी ढगांनी गर्दी केली होती. पण थेंबभरही पाऊस पडला नाही. त्यामुळे असहय़ उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांची निराशाच झाली आहे.

मागील तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानुसार विविध जिह्यांत अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वारे वाहून त्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. याचदरम्यान हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर जिह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे भाकीत केले होते, मात्र बुधवारपाठोपाठ गुरुवारीही हवामान खात्याचा अंदाज ‘फेल’ ठरला. मेघगर्जनेसह पावसाची हजेरी लागण्याऐवजी शहर व उपनगरांत उकाडा ‘जैसे थे’ राहिला. तसेच दुपारनंतर ढगाळ वातावरणाची तीव्रता वाढल्यामुळे उकाडय़ात आणखी भर पडली. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिह्यात संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाने हुलकावणी देणे सुरू ठेवले असताना हवामान खात्याने मुंबई शहर व उपनगरांसाठी शुक्रवारचे भाकीत करताना पावसाचा अलर्ट कायम ठेवला आहे.

हवामान खात्याचा अंदाज

पुढील काही दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडेल. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडेल, ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. तसेच अनेक जिह्यांना अवकाळी आणि वादळी वाऱयासह पावसाच्या हजेरीबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रायगडात आंबा, काजूला फटका

रायगड जिह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, तळासह विविध तालुक्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट यामुळे ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. या अवकाळीचा आंबा, काजू पिकांना याचा फटका बसला, तर अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. अनेक वाडय़ा-वस्त्यांवरील आंब्याच्या झाडांचा मोहोर गळून पडला, तर काही झाडांच्या कच्चा कैऱ्यांनाही गळती लागली.

ठाणे जिह्यातही नुकसान

ठाणे जिह्यातील किन्हवली भागालाही अवकाळीचा फटका बसला. पावसामुळे टाकीपठार परिसरातील सावलीस गावासह आजूबाजूच्या परिसरात आंबा बागायतदार, काकडी, भेंडी तसेच वीटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरांसाठी जमा करून ठेवलेला पेंढाही पावसात भिजला. अचानक आलेल्या संकटात आंब्याचे पीक हातचे गेल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करून बाधितांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बळीराजाने केली आहे.