
देशात एलपीजी सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घबराटीपोटी खरेदी करू नये, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. इंधन पुरवठ्याची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून वाढती मागणी लक्षात घेता उत्पादनातही मोठी वाढ करण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, देशभरात इंधनाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एलपीजी उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या इंधन पुरवठा सुरळीत असून रिफायनरींकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सरकार या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून पुरवठा स्थिर राखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत.
दैनंदिन ५० लाख सिलिंडरची डिलिव्हरी
पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, देशात कोठेही एलपीजीचा तुटवडा नसल्याची खात्री देण्यात आली आहे. सध्या दररोज ५० लाखांहून अधिक एलपीजी सिलिंडरची घरपोच सेवा दिली जात आहे. मात्र, नागरिकांमध्ये असलेल्या भीतीमुळे सिलिंडर बुकिंगच्या प्रमाणात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. बिगर घरगुती वापराच्या एलपीजी पुरवठ्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्य दिले जात आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक ग्राहकांसाठी एलपीजी वाटपाचा आढावा घेण्यासाठी इंडियन ऑइल, एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या कार्यकारी संचालकांची तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्य सरकारचे अधिकारी आणि उद्योग संघटनांशी चर्चा करून उपलब्ध साठ्याचे पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने वितरण कसे होईल, याचे नियोजन करत आहे, अशी माहितीही सरकारने दिली.


























































