
पावसाळा सुरू होण्यास अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना प्रशासनाकडून पावसाळापूर्व कामे कमालीची संथगतीने सुरू आहेत. नालेसफाई रखडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबई तुंबण्याचा धोका आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या या हलगर्जीपणाविरोधात शिवसेना आज सभागृहात चांगलीच आक्रमक झाली.
पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज पालिका सभागृहात पावसाळापूर्व कामांसंदर्भात निवेदन केले. पावसाळा तोंडावर आला तरी पावसाळापूर्व कामे संथगतीने सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. रस्त्यांवर खड्डे आहेत. परंतु सद्यस्थितीत प्रशासनाने मुंबई शहरातील अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची माहिती तर दिलीच नाही. उलट काही खासगी एजन्सीमार्फत अनधिकृतपणे पाण्याचा प्रवाह अडविण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला. नालेसफाई, मिठी नदीची सफाई रखडल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून प्रशासनाला मुंबईकरांच्या सुविधांबाबत गांभीर्य नसल्याचेही त्या म्हणाल्या. त्यामुळे पालिका, सत्ताधाऱ्यांनी पावसाळापूर्व कामांची सविस्तर माहिती विशेष बैठक घेऊन द्यावी, असेही त्या म्हणाल्या.
कामात हलगर्जीपणा दिसल्यास आंदोलन – अंकित प्रभू
मुंबईतील पावसापूर्व नालेसफाईच्या कामात रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे यंदाही मुंबईकरांना पुराचा फटका बसण्याची भीती शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी व्यक्त केली. प्रभाग क्र. 54मध्ये नालेसफाईची स्थिती गंभीर असल्याचे ते म्हणाले. नालेसफाई वेगाने करावी, पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. पावसाळापूर्व कामांसंदर्भात प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
गारगाई धरण प्रकल्पाला मंजुरी
गारगाई धरण प्रकल्प पूर्ण होण्यास 6 वर्षांचा कालावधी लागणार असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गारगाई धरण प्रकल्पाला कधी सुरुवात होणार, कधी संपणार याबाबत प्रशासनाकडून काहीच स्पष्टता नाही. पाऊस पडला तर धरण भरणार म्हणजे पावसावर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प खर्चिक असून समुद्राचे खारे पाणी गोडे हा प्रकल्प दोन वर्षात होईल आणि दोन हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्यामुळे गारगाई प्रकल्पाचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात यावा, अशी उपसूचना ठाकरे सेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी गुरुवारी सभागृहात केली. यावर मुंबईकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सभागृह नेते गणेश खणकर म्हणाले. अखेर आरोप प्रत्यारोपात फणसे यांची उपसूचना बहुमताने नामंजूर करीत गारगाईचा मूळ प्रस्ताव बहुमताने मंजूर केल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले.






























































