
ना करांमध्ये कपात… ना सोने-चांदीच्या महागाईवर उतारा… ना बेरोजगारीवर ठोस उपाय… ना अमेरिकेच्या टॅरिफ नीतीला उत्तर, असा कुठलाही सुखद धक्का किंवा कठोर उपाययोजना नसलेला 2026-27 या वर्षाचा अळणी, पुळपुळीत आणि पचकवणी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडला. सुमारे दीड तासाच्या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मलाताईंनी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी लाखो कोटींच्या तरतुदीचे आकडे फेकले खरे, पण त्यांचे संकल्पाशी पूर्ण वाकडे असल्याचे दिसले. महिला किंवा मध्यमवर्गीयांना कुठलाही दिलासा देण्याऐवजी ‘एफएनओ’ शेअर ट्रेडिंगवरील करात मोठी वाढ करत तरुणांना झटका दिला. या अर्थसंकल्पाचे नकारात्मक पडसाद लगेचच शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स तब्बल दीड हजाराहून अधिक अंकांनी, तर निफ्टी 495 अंकांनी गडगडला. सोने-चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली. घोर अपेक्षाभंगामुळे सर्वसामान्यांसह तज्ञांनीही अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवली.
अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडला. या वेळी केलेल्या भाषणात सीतारामन यांनी मोठमोठे दावे केले. वेगवान आणि शाश्वत आर्थिक विकास, लोकांच्या आशा आकांक्षाची परिपूर्ती व साधनसंपत्ती, संधी व सुविधांचा प्रत्येकाला लाभ या तीन कर्तव्यांपासून प्रेरणा घेऊन हा अर्थसंकल्प तयार केला आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. ‘आमच्या सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. 2047 पर्यंत देश ग्लोबल लीडर बनेल,’ असे सीतारामन म्हणाल्या.
करमुक्त उत्पन्न मर्यादा ‘जैसे थे’
नवी करप्रणालीअंतर्गत मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले होते. यंदा ही मर्यादा 14 लाखांपर्यंत वाढवली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
शेतकऱ्यांचा विसर
पीएम किसान योजनेतील अर्थसहाय्य 6 हजार रुपयांवरून 12 हजार होणार अशी चर्चा होती. मात्र यात काहीही बदल झालेला नाही. किमान आधारभूत किमतींबाबतही कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही.
ज्येष्ठ नागरिकही दुर्लक्षित
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विमा योजना आणि रेल्वे तिकिटात सवलत दिली जाईल, असे बोलले जात होते. मात्र केवळ रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या टीडीएस कपातीमध्येही बदल करण्यात आलेला नाही.
नव्या करप्रणालीत सवलत वाढ नाही!
जुन्या करप्रणालीप्रमाणेच नव्या करप्रणालीच्या अंतर्गतही पीपीएफ, एनपीएस आणि ईएलएसएससारख्या योजनांतील गुंतवणुकीवर करमाफी होण्याची अपेक्षा होती. मात्र तशी कोणतीही घोषणा झालेली नाही. जुन्या करप्रणालीत कलम 80 सी अंतर्गत या गुंतवणुकीवर दीड लाखापर्यंत सूट मिळते.
दुकानाचो बोलबालो, पन उदारेन मेलो
निर्मला सीतारामन यांनी आज 53.47 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाचा हा आकडा सर्वसामान्यांचे डोळे दिपवणारा आहे, मात्र यातील सुमारे 17 लाख कोटी रुपये कर्जातून येणार आहेत. शिवाय, घेतलेल्या कर्जापोटी सुमारे 20 टक्के रक्कम व्याजापोटी द्यावी लागणार आहे. हे आकडे बघता, ‘दुकानाचो बोलबालो पन उदारेन मेलो’ म्हणजेच बाहेरून रुबाब आणि आतून सगळा उधारीवर कारभार अशी सरकारची स्थिती आहे.
चुलीत नाय खापार आणि गावभर करता येपार
उद्योजकांची पुरती निराशा झाली आहे. शेअर बायबॅकवरील करवाढ नकारात्मक ठरली आहे. एसटीटी वाढीमुळे ब्रोकरेज फर्म चिंतेत आहेत. बँकिंग सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नियंत्रण वाढण्याची भीती बँकिंग क्षेत्रात आहे. नोकरदारांची क्रयशक्ती वाढणार नसल्याने त्याचा फटका अंतिमतः कंपन्यांच्या उत्पादनांना बसणार आहे. अमेरिकेच्या टॅरिफचा सामना करण्यासाठी बजेटमध्ये घोषणा नसल्यामुळे निर्यातदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे ‘चुलीत नाय खापार आणि गावभर करता येपार’ अशी उद्योजकांची अवस्था आहे.
तळ तळ तळी आनी खावकगेल्यार अळवाची नळी
2026-27 च्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या 4.3 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ उत्पन्नापेक्षा खर्च अधिक राहणार आहे. असे असतानाही सीतारामन यांनी विविध क्षेत्रांसाठी लाखो कोटींची तरतूद केली आहे. तसेच भांडवली खर्चात एक लाख कोटींची वाढ करून ते 12.2 लाख कोटींवर नेण्यात आले आहे. त्यामुळे ‘तळ तळ तळी आनी खावक गेल्यार अळवाची नळी’ अशी प्रतिक्रिया उमटली.
चव नाय ढव नि बाबल्या पॉटभर जेव
खिशात जास्तीचा पैसा यावा आणि जीवनावश्यक वस्तू स्वस्त व्हाव्यात अशी मध्यमवर्गीयांची अपेक्षा असते. मात्र त्यांची निराशा झाली. इन्कम टॅक्स रचनेत कुठलाही बदल नाही. खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी कोणतीही योजना नाही. पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची घोषणाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘चव नाय ढव
नि बाबल्या पॉटभर जेव’ अशी मध्यमवर्गीयांची अवस्था झाली आहे.
काय स्वस्त
वैद्यकीय उपकरणे, लिथियम आयन बॅटरी, सौर पॅनेल, एलसीडी, एलईडी, हिंदुस्थानात बनलेले कपडे, कर्करोगाची 17 औषधे व मधुमेहाची औषधे, क्रीडा साहित्य, मोबाईल पह्न, मायक्रोवेव्ह ओव्हन, ईव्ही बॅटरी, ईव्ही वाहने, मोटारसायकल, फ्रोझन मासे, सीएनजी, बायोगॅस, अपघात विमा, जोडे, परदेशातील टूर पॅकेज, विमानाचे सुटे भाग.
काय महाग
पीव्हीसी फ्लेक्स शीट्स, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल, लग्झरी घडय़ाळे, परदेशी परफ्युम, वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या वस्तू, चघळण्याचा तंबाखू, फिल्टर खैनी, जर्दा, गुटखा, मद्य, सिगारेट, खनिजे, ऑप्शन्स ट्रेडिंग, भंगार.
गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
एसटीटी टॅक्समध्ये वाढ करण्याची घोषणा व उद्योग जगतासाठी एकूणच निराशाजनक अर्थसंकल्पाचे तीव्र पडसाद आज शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स 1547 अंकांनी घसरून 80,722.94 वर बंद झाला, तर निफ्टी 495 अंकांनी पडून 24,825 वर स्थिरावला. या घसरणीमुळे बीएसईवरील सूचीबद्ध पंपन्यांचे भांडवली मूल्य 460 लाख कोटींवरून 450 लाख कोटींवर आले. परिणामी गुंतवणूकदारांचे सुमारे 10 लाख कोटींचे नुकसान झाले. निफ्टी बँक इंडेक्स 1193 अंकांनी आणि मिडकॅप इंडेक्स 1311 अंकांनी पडला. सहा वर्षांत बजेटच्या दिवशी शेअर बाजारात झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे.
‘जेन झी’ची वाय झेड
फ्युचर्स व्यवहारांवरील टॅक्स 0.02 टक्क्यांवरून 0.05 टक्के करण्यात आला आहे, तर ऑप्शन्स व्यवहारांवरील टॅक्स 0.1 टक्क्यावरून 0.15 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. ही वाढ अनुक्रमे 150 टक्के आणि 50 टक्के इतकी आहे. देशातील ‘जेन झी’साठी हा धक्का मानला जात आहे. कोविडनंतरच्या काळात स्टॉक मार्पेटमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यात ‘जेन झी’ आणि ‘मिलेनियल’ वर्गातील ट्रेडर्सचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांचा ओढा मोठ्या प्रमाणावर ‘एफएनओ’ अर्थात फ्युचर्स आणि ऑप्शन्सकडे आहे, मात्र आता एसटीटीमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे. कालांतराने हे तरुण दीर्घकालीन गुंतवणूकदार होण्याची शक्यता असते. मात्र टॅक्स वाढीमुळे या सगळय़ाची वाय झेड झाली आहे.
हा अफाट संधीचा महामार्ग!
हा अर्थसंकल्प अपार संधींचा महामार्ग आहे. हिंदुस्थानच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्याची क्षमता यात आहे. 2047 च्या विकसित भारताच्या उड्डाणाचा हा आधार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशातील खऱ्या संकटांकडे दुर्लक्ष
तरुण रोजगाराविना आहेत. गुंतवणूकदार पळून जातायत. शेतकऱयांची अवस्था दयनीय आहे. उद्योग-व्यापारात धक्के बसत आहेत. देशातील खऱया संकटांकडे दुर्लक्ष केले गेले, अशी तोफ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डागली.


























































