बंगळुरूमध्ये पुन्हा ओन्ली कॅश

एकेकाळी डिजिटल पेमेंटमध्ये अग्रेसर असलेले बंगळुरू शहर आता पुन्हा रोख व्यवहारांकडे वळत आहे. छोटे विक्रेते, दुकानदार यांना लाखोच्या जीएसटी नोटिसा मिळाल्या आहेत. त्यामुळे कर अधिकाऱ्यांचा दबाव आणि दुकान हटवले जाईल याची भीती वाटून अनेक विक्रेत्यांनी नो यूपीआय, ओन्ली कॅश असा पवित्रा घेतला आहे.

बंगळुरमधील हजारो छोटे व्यापारी, रस्त्यावर खाण्यापिण्याचे विक्रेते, चहा विकणारे यांना नोटीस आली आहे. काही दुकानदारांना तर लाखोंच्या नोटिसा आल्या आहेत. बंगळुरू स्ट्रीट वेंडर्स असोसिएशनचे संयुक्त सचिव अॅड. विनय श्रीनिवासन सांगितले की, छोटे व्यापारी व दुकानदारांना जीएसटी अधिकारी त्रास देत आहेत. दुकानदारांना दुकान बंद होण्याची भीती आहे म्हणून ते यूपीआय पेमेंटऐवजी रोखीच्या व्यवहाराला प्राधान्य देत आहेत. केंद्र सरकारच्या जीएसटी कायद्यांतर्गत कोणत्याही सामानाची विक्री करणाऱ्यांना जीएसटीअंतर्गत नोंदणी करावी लागते.