
महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदे गटाशी केलेली युती अखेर गाजराची पुंगी ठरली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी दोन्ही पक्षांनी उमेदवारी कायम ठेवल्याने युती तुटल्यावर शिक्कामोर्तब झाले.
महापालिकेसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या युतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली होती. जागावाटपात शिंदे गटाला केवळ 16 जागा देण्याची तयारी भाजपने दाखवली. त्यावरही शिंदे गट राजी होत असल्याचे दिसताच शिंदे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांच्या घरासमोर आंदोलन करत गोऱहे यांच्यासह आमदार विजय शिवतारे, नाना भानगिरे यांच्यावर कमर्शिअल पद्धतीने तिकीट वाटपाचा आरोप केला होता. त्यानंतरही जागावाटपाची चर्चा सुरू होती. एका बैठकीत भानगिरे आणि शिवतारे यांची हमरीतुमरी झाली. दुसरीकडे भाजपकडून शिंदे गटाला जागावाटपात खेळवत ठेवण्याचे काम सुरूच होते. भाजपने जागावाटपात खेळवत रातोरात गुपचूप त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म देत 165 जागांवर उमेदवारी अर्ज भरून शिंदे गटाला पहिला झटका दिला. ही गोष्ट शिंदे गटाला समजायला उमेदवारी भरण्याचा अखरेचा दिवस उजाडला होता. त्यानंतर शिंदे गटाने मागेल त्याला एबी फॉर्म देत अर्ज भरले आणि युती तुटल्याची घोषणा माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी केली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही शिंदे गटाचे मंत्री सामंत युती अभेद्य असून चर्चेअंती उमेदवारी अर्ज मागे घेऊन युती करू असे ठामपणे सांगत सुटले. पण प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतही दोन्ही पक्षांचे अर्ज कायम होते. त्यामुळे युती तुटल्याचे स्पष्ट झाले.
मोहोळांचा मैत्रीपूर्ण लढतीचा दावा
युती तुटल्यानंतरही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना भाजप आणि शिंदे गट पुण्यात पालिका निवडणूक मैत्रिपूर्ण लढत असल्याचा दावा केला आहे.
































































