28 वर्षांनी नॉर्वेचा वर्ल्ड कपमध्ये सूर्योदय; हालंदच्या गोलांनी केला कहर, इटलीवर अपात्रतेची टांगती तलवार

मध्यरात्री सूर्य उगवणाऱ्या नॉर्वेत अखेर 28 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर फिफा वर्ल्डकप पात्रेतचा सूर्योदय झाला. एलिंग हालंदच्या अद्भुत दोन गोलांच्या जोरावर नॉर्वेने माजी जगज्जेत्या इटलीचा 4-1 असा धुव्वा उडवत 1998 नंतर प्रथमच फिफा वर्ल्डकपचे तिकीट मिळवले. मात्र या पराभवाने इटलीवर सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतच बाद होण्याचे संकट ओढवले आहे.

नार्वेने आपल्या गटातील सर्व सामने जिंकत 24 गुणांची कमाई केली आणि वर्ल्डकपचे दार उघडले. 78 व्या आणि 79 व्या मिनिटाला सलग दोन गोल झळकवत हालंदने नॉर्वेला अभूतपूर्व असा विजय मिळवून दिला. या गोलांसह हालंदने पात्रता फेरीत 16 गोल करण्याची किमया साधली. हालंदच्या करिश्म्याआधी 1998 साली नॉर्वे वर्ल्ड कप खेळला होता आणि त्या संघात हालंदचे वडील संघात खेळले होते.

 इटलीसाठी वैऱ्याची रात्र

 इटलीसाठी नॉर्वेविरुद्ध विजयाची नितांत गरज होती, पण पदरी अपयशच पडले आणि इटलीसाठी रविवारची रात्र लाजिरवाणी आणि पराभवाची ठरली. लढतीच्या 11व्या मिनिटाला केलेल्या गोलने इटलीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती, पण नुसाच्या बरोबरी गोलनंतर हालंदने दहा मिनिटे असताना केलेल्या दोन गोलांनी नॉर्वेला वर्ल्ड कपमध्ये आणले. तसेच इंजरी टाइममध्ये जॉर्गन लार्सनने चौथा गोल करीत इटलीचे संकट वाढवले. आता इटलीची सलग तिसऱ्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची शक्यता वाढली आहे.

2018 आणि 2022 च्या वर्ल्ड कपसाठीही त्यांचा संघ पात्र न ठरल्यामुळे ते प्रचंड दबावाखाली होते. आता तो दबाव आणखी वाढलाय. मार्चमध्ये होणाऱ्या प्ले-ऑफ फेऱ्यांमध्ये विजय मिळवला तरच त्यांना वर्ल्ड कप प्रवेशाची संधी असेल. नाहीतर त्यांना 2030च्या वर्ल्ड कपची तयारी सुरू करावी लागेल.

 नायजेरियाचे स्वप्न भंग

आफ्रिकन पात्रतेतही मोठा धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये कोंगोने नायजेरियाला 4-3 पेनल्टी असे पराभूत करत त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. सामना 1-1 वर संपल्यानंतर एक्स्ट्रा टाइममध्येही निकाल लागला नाही. अखेर पावसात आणि दडपणात खेळलेल्या शूटआउटमध्ये कोंगोने अप्रतिम झुंज देत 1974 नंतर प्रथमच वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवले. 51 वर्षांपूर्वी कोंगोचे नाव झैरे होते.

2026 चा फिफा वर्ल्डकप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणार असून पहिल्यांदाच 48 संघ स्पर्धेत उतरणार आहेत. आतापर्यंत 32 संघांनी पात्रता मिळवली आहे. आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ओशिनियातील प्रमुख संघांनी स्थान निश्चित केले असून नॉर्वेने युरोपमधून चमकदार पुनरागमनाची नोंद केली आहे.

2026 च्या वर्ल्ड कपसाठी पात्र संघ

यजमान – पॅनडा, मेक्सिको, अमेरिका

आशिया – ऑस्ट्रेलिया, इराण, जपान, जॉर्डन, कतार, सौदी अरब, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान

आफ्रिका – अल्जीरिया, केप वर्डे, इजिप्त, घाना, आयव्हरी कोस्ट, मोरोक्को, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, टय़ुनिशिया

युरोप – क्रोएशिया, इंग्लंड, फ्रान्स, नॉर्वे, पोर्तुगाल

ओशिनिया – न्यूझीलंड

दक्षिण अमेरिका  – अर्जेंटिना, ब्राझील, कोलंबिया, इक्वाडोर, पॅराग्वे, उरुग्वे