मला नोबेल दिले नाही; आता शांततेची अपेक्षा करू नका! डोनाल्ड ट्रम्प यांचे नॉर्वेच्या पंतप्रधानांना पत्र

नोबेल शांतता पुरस्कार मिळत नसल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. ‘मला नोबेल पुरस्कार दिलेला नाही. त्यामुळे माझ्याकडून शांततेची अपेक्षा करू नका,’ असे ट्रम्प यांनी सुनावले आहे.

नोबेल समितीमध्ये नॉर्वे सरकारचीदेखील महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळेच ट्रम्प यांनी स्टोरेस यांनाच लक्ष्य केले आहे. ‘मी जगातली 8 पेक्षा जास्त युद्धे थांबवली. तरीही तुम्ही नोबेलसाठी माझा विचार केला नाही. त्यामुळे आता शांतता राखण्याची जबाबदारी माझी नाही. संयुक्त अमेरिकेसाठी काय योग्य आणि चांगले याचाच विचार मी आता करेन,’ असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

…तोपर्यंत जग सुरक्षित राहणार नाही!

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता अमेरिकेने ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे. चीन आणि रशियासारख्या बलाढय़ शक्तींपासून डेन्मार्क एकटा ग्रीनलँडचे रक्षण करू शकत नाही. ‘नाटो’ची स्थापना झाल्यापासून अमेरिकेने या संघटनेसाठी सर्वात जास्त काम केले आहे. आता ‘नाटो’ने अमेरिकेसाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत अमेरिका ग्रीनलँडचा पूर्ण ताबा घेत नाही तोपर्यंत जग सुरक्षित राहणार नाही, अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे.