
चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) दिल्ली कॅपिटल्सवर 23 धावांनी मिळवलेल्या विजयात कर्णधार संजू सॅमसनने शतक झळकावले असले तरी खरा गेमचेंजर जिमी ओव्हरटनच असल्याचे मत मांडून माजी कसोटीपटू वसीम जाफरने सामनावीर निवडीवरच आपला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे जाफरची ही थेट प्रतिक्रिया अनेकांना खटकली आहे.
सामन्यात संजू सॅमसनने 56 चेंडूंत नाबाद 115 धावांची तुफानी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले, मात्र जाफरच्या मते ही कहाणी इतकीच नाही. फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर ओव्हरटनने टाकलेली 4 षटकेच सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट आहेत. त्याने केवळ 18 धावा देत 4 महत्त्वाचे विकेट घेत दिल्लीचा डाव 189 धावांत गुंडाळला आणि सीएसकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
ओव्हरटनची ती धारदार गोलंदाजी नसती, तर सीएसकेचा विजय शक्यच नव्हता. 210 धावांच्या मोठय़ा लक्ष्याच्या सामन्यात त्याने घेतलेले निर्णायक विकेट हेच खरे गेमचेंजर ठरले आहेत.
मात्र जाफरने ओव्हरटनच्या गोलंदाजीप्रमाणे सॅमसनच्या शतकाचे महत्त्वही मान्य केले. सॅमसनने अशी खेळी केली नसती, तर सीएसके 212 धावांपर्यंत पोहोचली नसती, असेही तो म्हणाला. पण लगेचच त्याने मोठय़ा सामन्यात, जेव्हा फलंदाजी तुलनेने सोपी असते, तेव्हा सामना जिंकून देणाऱ्या गोलंदाजालाच खरी दाद मिळायला हवी, असा मुद्दाही अधोरेखित केला.
थोडक्यात सॅमसनने डाव रंगवला, पण विजयावर शिक्कामोर्तब करणारा वार ओव्हरटननेच केला. त्यामुळे ‘सामनावीर’चा खरा मानकरी ओव्हरटनच ठरायला हवा होता, असे जाफरने मत मांडले.




























































