इराणसोबतचे युद्ध लवकरच संपणार, तेथे लक्ष्य करण्यासाठी काहीही उरलेले नाही; ट्रम्प यांचं वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध लवकरच संपुष्टात येऊ शकते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. इराणमधील लष्करी तळांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले असून आता तिथे निशाणा बनवण्यासाठी काहीही उरले नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

बुधवारी अमेरिकन मीडिया प्लॅटफॉर्म ‘Axios’ ला दिलेल्या पाच मिनिटांच्या मुलाखतीत ट्रम्प यांनी युद्धाच्या समाप्तीचे संकेत दिले. ट्रम्प म्हणाले की, “आता इराणमध्ये लक्ष्य करण्यासारखे जवळजवळ काहीही उरलेले नाही. मला जेव्हा वाटेल, तेव्हा मी हे युद्ध संपवू शकतो.” मात्र हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका नेमकी कोणती रणनीती अवलंबणार किंवा युद्धविरामाची औपचारिक प्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली नाही.

एकीकडे ट्रम्प युद्ध संपवण्याबाबत बोलत असताना, दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र युद्ध थांबवण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इराणवर किमान आणखी दोन आठवडे लष्करी हल्ले सुरू ठेवण्याची तयारी केली जात आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनीही ठामपणे सांगितले आहे की, जोपर्यंत सर्व उद्दिष्टे साध्य होत नाहीत आणि निर्णायक विजय मिळत नाही, तोपर्यंत ही मोहीम कोणत्याही कालमर्यादेशिवाय सुरू राहील.

दरम्यान, २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या भीषण युद्धात आतापर्यंत शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अनेक लष्करी आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले आहे, तर इराणनेही अमेरिकन तळांवर प्रत्युत्तरी हल्ले चढवले आहेत. बुधवारीही इराणने खाडी क्षेत्रात अनेक ड्रोन हल्ले केले.