
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 52 आडत व्यापाऱ्यांना दुकान गाळे बांधकाम परवानाबाबत योग्य पुरावा घेऊन नगरपालिका येथे हजर राहण्याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्याने व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे.
नुकतेच नगरपालिकेने बसस्थानकामागील 90 व्यापारी गाळेधारकांना नोटीस दिली होती. यानंतर येथील अनधिकृत गाळय़ांवर अतिक्रमण हटावची मोठी कारवाई केली होती. गुलाबरसुल अ. गफुर नदाफ यांच्यासह 15 ते 20 बागवान लोकांनी अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून अनधिकृतपणे व्यापारी गाळे बांधल्याची लेखी तक्रार नगरपालिकेकडे दाखल केली होती. या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने 52 आडत व्यापाऱ्यांना दुकान गाळे बांधकाम परवानासंदर्भात योग्य ते पुरावे घेऊन नगरपालिकेत हजर रहावे, मालकी हक्क पुरावा बांधकामसंदर्भात घेण्यात आलेली परवानगी, मंजूर नकाशा, बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्याची एक प्रत प्रशासनास सादर करून सुनावणीस हजर राहावे, असे नोटिसीत म्हटले आहे. तसेच या सुनावणीस गैरहजर राहिल्यास अथवा योग्य पुरावे सादर न केल्यास आपले काही म्हणणे नाही, असे समजून योग्य ती पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
नगरपालिका प्रशासनाने बसस्थानकामागील 91 व्यापारी गाळय़ांबाबत नोटीस देऊन मोठी कारवाई केल्याने शहरातील विनापरवाना बांधकाम, अतिक्रमणबाबत नगर पालिका प्रशासनाकडे दाखल तक्रारीच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे विनापरवाना बांधकाम पार्किंगच्या जागेचा इतर कारणासाठी वापर, व्यावसायिक वापराच्या मालमत्ताकर चुकवेगिरीबाबत काटेकोर अंमलबजावणी केल्यास नगरपालिकेला मोठा महसूल मिळू शकतो.