टेनिस कोर्टचा बेताज बादशहा! नोवाक जोकोविचचा विक्रमी विजय, ग्रँड स्लॅममध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच

सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचने Australian Open 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत त्याने कमाल केली असून बोटिक व्हॅन डी झँडस्चलपविरुद्ध झालेल्या सामना 3-0 अशा फरकाने जिंकला आणि प्री-क्वार्टर फायनलमध्ये अगदी रुबाबात धडक मारली. या विजयासह त्याने ग्रँड स्लॅम स्पर्धेतील 400 वा विजय साजरा केला. त्याचा हा 400 विजय ऐतिहासिक ठरला असून ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या इतिहासात 400 सामने जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

नोवाक जोकोविचने बोटिक व्हॅन डी झँडस्चल्पविरुद्ध झालेल्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पहिला सेट 6-3, दुसरा सेट 6-4 आणि तिसरा सेट 7-6 अशा फरकाने जिंकला आणि सामनाही आपल्या नावावर केला. त्याचा हा विजय सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला आहे. ग्रँड स्लॅमच्या इतिहासात 400 सामने जिंकणारा नोवाक एकमेव आणि पहिलाच खेळाडू ठरला आहे. ग्रँड स्लॅममध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर पहिल्या क्रमांकावर 400 विजयांसह नोवाक जोकोविचने सिंहासन पटकावलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रॉजर फेडरर (369), राफेल नदाल (314), जिमी कॉनर्स (233) आणि आंद्रे अगासी (224) या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.