आता रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करण्यासाठी होणार गुगलची मदत! काय आहे हे नवीन एआय फीचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखादी संध्याकाळ किंवा सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी आपण अॅपचा वापर करुन टेबल बुक करायचो. त्यामुळे आपला वेळ वाचायचा शिवाय नानाविध सवलतींचाही फायदा मिळायचा. परंतु आता मात्र गुगलच्या माध्यमातून टेबल बुक करुन आपल्याला नानाविध पर्याय अनुभवता येणार आहेत. त्यामुळे आता  रेस्टॉरंटमध्ये जाणे पूर्वीपेक्षा अधिक सुकर होणार आहे.

गुगलने एक नवीन एआय फीचर आता सादर केले आहे. यामुळे बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाणे आता खूप सोयीचे आणि सुलभ होणार आहे. त्यामुळेच आता रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी तासन् तास वेळ घालवायला नको. हे नवीन फीचर गूगलच्या एआय मोडचा एक भाग आहे. हे नवीन फीचर जेमिनीवर आधारित असून, रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधी काही ठराविक एॅपच्या माध्यमातून आपल्याला शोधणे हे फार क्लिष्ट व्हायचे. परंतु आता मात्र आपण एखादा ठराविक विभाग किंवा रेस्टॉरंट टाकल्यास, लगेच आपल्या गरजांनुसार नावांची यादी समोर येते. उदारहणार्थ आपण समजा मुंबईतील किंवा पुण्यातील ठराविक विभागातील रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये उद्यासाठी टेबल बुक करा,” असे टाईप केले, तर एआय तुमच्या गरजा समजून घेते आणि त्यानुसार पर्याय आपल्याला दाखवणार आहे.

एआय ही माहिती झोमॅटो आणि स्विगी सारख्या प्लॅटफॉर्मवरून डेटा गोळा करुन आपल्यासमोर सर्वोत्तम पर्याय सादर करते. त्यामुळे आपल्याला वेगवेगळी रेस्टॉरंट्स, त्यांच्या वेळा आणि उपलब्ध स्लॉट्स सर्व एकाच ठिकाणी दिसतात. त्यानंतर आपण थेट तिथूनच बुकिंग करू शकतो. तसेच बऱ्याच प्रकरणांमध्ये एआय आपोआप बुकिंग प्रक्रिया सोपी करते. त्यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात.

हे नवीन फीचर एजंटिक एआयच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. याचा अर्थ असा की, एआय (AI) यापुढे केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित राहणार नाही. तर ते आता आपल्या वतीने अनेक नानाविध कामे देखील पार पाडणार आहे. त्यामुळे याआधी वेगवेगळे ॲप्स उघडून त्यांची तुलना करावी लागत होती, तिथे आता एआय हे सर्व सहजगत्या उपलब्ध करुन देणार आहे.

यामुळे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील कामे अधिक सुकर होणार आहेत. या नवीन बदलामुळे सर्चच्या एका नवीन माध्यमाची सुरुवात झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.