
नवीन टेक्नोलॉजीमुळे अनेक गोष्टी सोप्या होत आहेत. आता देशातील खासगी बँका आणि दूरसंचार कंपन्या या ‘सायलेंट ऑथेंटिकेशन’ टेक्नोलॉजीवर काम करत आहेत. जर ही टेक्नोलॉजी सुरू करण्यात आली तर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी वन टाइम पासवर्ड म्हणजेच ‘ओटीपी’ची गरज लागणार नाही. विना ओटीपी ऑनलाइन पेमेंट करता येईल, अशी माहिती ऑक्सिस बँकेचे डिजिटल बिझनेस हेड समीर शेट्टी यांनी दिलीय.
‘सायलेंट ऑथेंटिकेशन’ टेक्नोलॉजी ई-सीमवरसुद्धा काम करेल. यामुळे सिम क्लोनिंग आणि ई-सिम स्वॅपसारखी फसवणूक थांबण्यास मदत होईल. आम्ही टेलिकॉम कंपन्यांसोबत मिळून सायलेंट ऑथेंटिकेशनच्या अनेक पायलट प्रोजेक्टवर काम करत आहोत. जर एखादी व्यक्ती अॅपमध्ये लॉग-इन असेल, परंतु तिचा मोबाईल नंबर नोंदणीकृत नंबरशी जुळत नसेल तर टेलिकॉम नेटवर्क आम्हाला याचा सिग्नल देतील, त्यानंतर आम्हाला ग्राहकाला त्रास न देता संभाव्य फसवणूक शोधता येईल, असे शेट्टी म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार, आता देशातील सर्व डिजिटल व्यवहारांसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यात पासवर्ड किंवा पिन, ओटीपी आणि बायोमेट्रिक्स यांचा समावेश आहे. बँकांना आता फिंगरप्रिंट आणि डिव्हाईसची स्वतःची सुरक्षा यांसारख्या आधुनिक पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
यूपीआयवरून दररोज 1 लाख कोटींचे व्यवहार
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयने आर्थिक वर्ष 2026 मध्ये आणखी एक मोठा रेकॉर्ड केला आहे. वर्षभरात यूपीआयवरून 308 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. मार्च 2026 मध्ये 30 लाख कोटी व्यवहार झाले असून सरासरी दररोज 1 लाख कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. मार्च 2026 मध्ये यूपीआयने 29.53 लाख कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन केले. आर्थिक वर्ष 2026 मध्ये एकूण व्यवहार 241.6 अब्जपर्यंत पोहोचले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण वर्षभरात सरासरी दररोज 84,500 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामुळे डिजिटल पेमेंट सिस्टम मजबूत दिशेने जात आहे.


























































