15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढवणार; मध्य व पश्चिम रेल्वेवरील प्रकल्पांचा रेल्वे बोर्ड अध्यक्षांकडून आढावा

जूनमध्ये मुंब्य्रात पाच प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन अखेर प्रवासी सुरक्षेबाबत जागे झाले आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी सोमवारी प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मध्य व पश्चिम रेल्वेवरील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी उपनगरी रेल्वे मार्गावर 15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढवणे तसेच इतर उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘चिंतन’ कॉन्फरन्स हॉलमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष विलास वाडेकर, रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष मनोज गर्ग, मध्य व पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक तसेच रेल्वे बोर्ड आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सीएसएमटी स्थानक पुनर्विकासाची पाहणी

जागतिक वारसा स्थळ असलेल्या सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासासंबंधी रेल्वे जमीन विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या प्रकल्पाची पाहणी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी केली. तीन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी सीएसएमटी ते नाशिक असा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. सिंहस्थ पुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून नाशिकमधील विविध स्थानकांची पाहणी केली. तसेच मुंबईतील घाटकोपर, खार स्थानकांबरोबरच जोगेश्वरी (एटी) यार्डमधील कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

मुंब्य्रातील वळणाकडे रेल्वे बोर्ड अध्यक्षांची पाठ

तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेले रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी मुंब्य्रातील जीवघेण्या धोकादायक वळणाकडे पाठ फिरवली. मुंब्रा येथील तीव्र वळण येताच लोकल ट्रेनमध्ये बसलेल्या आणि उभ्या असलेल्या प्रवाशांनाही जोरदार धक्का जाणवतो. त्या पार्श्वभूमीवर सतीश कुमार स्वतः मुंब्रा वळण परिसरात जातील, अशी अपेक्षा प्रवाशांनी बाळगली होती. मात्र त्यांनी प्रवाशांच्या अपेक्षेला धक्का देत मुंबई दौरा आटोपला.