महाराष्ट्राचा चित्ररथ देशात अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आयोजित संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला. यंदा गणेशोत्सव संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला. जम्मू-कश्मीरच्या चित्ररथाने दुसरा तर केरळच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला. याबाबतची घोषणा संरक्षण मंत्रालयाने केली.

यंदाच्या परेडमध्ये देशभरातून 30 चित्ररथ सहभागी झाले होते. ‘स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भर हिंदुस्थान’ ही मुख्य संकल्पना होती. गणेशोत्सव हा केवळ सण नाही, तर रोजगार, उद्योग आणि  आर्थिक साखळी निर्माण करणारी ताकद आहे, हा विचार महाराष्ट्राने चित्ररथाच्या माध्यमातून सुंदररीत्या मांडण्यात आला. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि त्याबद्दलचा अभिमान यातून झळकला.  तुषार प्रधान, रोशन इंगोले, कृष्णा सालवटकर, श्रीपाद भोंगाडे यांनी महाराष्ट्राचा चित्ररथ साकारला होता.

z महाराष्ट्राच्या चित्ररथात गणपती बाप्पा, अष्टविनायकाची प्रतिकृती, ढोलताशांचा गजर आणि उत्सवाचे रंगतदार चित्र दिसून आले. गणेशोत्सवातून आत्मनिर्भरता हा संदेश चित्ररथातून ठळकपणे मांडण्यात आला.

z गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात 60 ते 70 लाख कोटींची उलाढाल होते. ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेला गणेशोत्सवाच्या माध्यमातून कशी चालना मिळते, हा संदेश चित्ररथाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

z लोकमान्य टिळकांनी लोकांनी एकत्र येण्यासाठी गणेशोत्सवाची सुरूवात केली. गणेशोत्सवाचे स्वरूप दिवसेंदिवस मोठे होत चालले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात हा उत्सव जल्लोषात साजरा होतो.  मूर्तिकार, सजावट करणाऱयांना मिळणारा रोजगार तसेच त्यातून तयार होणारी आर्थिक साखळी हा चित्ररथाचा मुख्य विषय होता.