
शेकडो कोटी रुपयांचा चुराडा करूनही मुंबई-गोवा महामार्ग खड्यात गेला असून रोजच लहान-मोठे अपघात होत आहेत. सरकारच्या या पापामुळे आतापर्यंत हजारो प्रवाशांचा बळी गेला आहे. याविरोधात कोकणवासीयांचा संतापाचा स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या जिल्हा प्रशासनाने यापुढे महामार्गावर अपघात घडल्यास कंत्राटदार व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर अपूर्ण असलेली कामे आणि खड्यांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून अपघातही वाढले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल शेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास देवमाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यशवंत घोटकर उपस्थित होते. बैठकीपूर्वी महामार्ग प्राधिकरण आणि उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष महामार्गाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी रायगड जिल्ह्यातील ३५ ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे सुचवण्यात आले आहे. या ३५ ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे तत्काळ डागडुजी, दुरुस्ती करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कामात हयगय केल्यास कडक कारवाई केली जाणार असून अपघात झाल्यास कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू असा इशारा दिला. त्यामुळे कामचुकार बाबूंचे धाबे दणाणले आहेत.
तातडीने करणार या उपाययोजना
गणेशोत्सवादरम्यान चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील कामामध्ये प्रस्तावित असलेल्या शक्य तेवढ्या मार्गाचे रुंदीकरण करून घ्यावे. वाहतूक गतिमान होईल यासाठी खड्डे तत्काळ बुजवावे. संपूर्ण महामार्गावर दिशादर्शक बॅनर, बाण ठळकपणे लावावेत. आवश्यकतेप्रमाणे ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, गरज असलेल्या पुलावर सुरक्षेसाठी सुरक्षा जाळ्या लावाव्यात. अनेक ठिकाणी रस्त्यावर असलेले बांधकाम साहित्य, पावसामुळे वाहून आलेली रेती तसेच दगड हटवण्याची कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले.