अमेरिकेच्या एका निर्णयाने कच्च्या तेलाच्या किमती घसलरल्या, जागतिक बाजारपेठेला दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यामुळे जगासमोर एक मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अमेरिकेवर युद्ध थांबवण्यासाठी दबाव वाढत होता. मात्र अमेरिकेने युद्ध बंदीची घोषणा न करता असा एक निर्णय जाहीर केला की त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असून जागतिक बाजारपेठाला दिलासा मिळाला आहे.

इराण युद्धाच्या भडक्यामुळे गगनाला भिडलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींना लगाम घालण्यासाठी अमेरिकेने मोठे पाऊल उचलले आहे. समुद्रात अडकलेले रशियन कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्यासाठी अमेरिकेने ३० दिवसांचा विशेष परवाना (License) जारी केला आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत पुरवठा वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने शुक्रवारी सकाळी तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली.

तेलाच्या दरात झालेली घसरण

अमेरिकेच्या या निर्णयानंतर ब्रेंट क्रूडचे (Brent) दर ७१ सेंट्सनी घसरून ९९.७५ डॉलर्स प्रति बॅरलवर आले. तसेच अमेरिकन वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट (WTI) ८८ सेंट्सनी घसरून ९४.८५ डॉलर्सवर पोहोचले. गुरुवारी या किमतींनी ऑगस्ट २०२२ नंतरचा उच्चांक गाठला होता, मात्र आता त्यात काहीशी सुधारणा झाली आहे.

अमेरिकेची रणनीती काय?

अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेझेंट यांनी सांगितले की, इराण युद्धामुळे अस्थिर झालेल्या ऊर्जा बाजारपेठेला स्थिरता देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच अमेरिकेने आपल्या ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’मधून (SPR) १७.२ कोटी बॅरल तेल बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’ने (IEA) देखील विक्रमी ४० कोटी बॅरल तेल सोडण्याचे मान्य केले आहे.

होर्मुझची समुद्रधुनी आणि इराणचा पवित्रा

बाजारपेठेत किमती काहीशा कमी झाल्या असल्या तरी मूळ समस्या अद्याप सुटलेली नाही. इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी होर्मुझची समुद्रधुनी बंदच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इराकच्या बंदरांवरील कामकाज पूर्णपणे थांबले असून ओमाननेही खबरदारीचा उपाय म्हणून आपली जहाजे मुख्य टर्मिनलवरून हलवली आहेत.

संरक्षणात्मक पावले

अमेरिकेचे ट्रेझरी सचिव बेझेंट यांच्या मते, लष्करीदृष्ट्या शक्य झाल्यास अमेरिकन नौदल आंतरराष्ट्रीय आघाडीच्या मदतीने व्यापारी जहाजांना होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षा (Escort) देऊ शकते. दुसरीकडे, सौदी अरेबिया आपले तेल ‘ईस्ट-वेस्ट’ पाईपलाईनद्वारे लाल समुद्रातून (Red Sea) जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी धडपड करत आहे. इराणने मात्र चीनला खुश ठेवण्यासाठी दिवसाला एक किंवा दोन टँकर्स सोडण्याची मुभा दिली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

अर्थात जरी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी या किमती फार मोठी घसरण झालेली नाही. त्यामुळे आर्थिक संकट पूर्णपणे टळले आहे असे अजिबात नाही. मात्र रशियाचे समुद्रात असलेले कच्चे तेल खरेदीची परवानगी मिळाल्याने तातडीने थोडा दिलासा नक्की मिळेल असा विश्वास तज्ज्ञांना वाटतो.