Saina Nehwal Retirement – ‘फुलराणी’चा बॅडमिंटनला रामराम; ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालची निवृत्तीची घोषणा

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू सायन नेहवाल हिने स्पर्धात्मक खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे. वाढते वय आणि दुखापतींमुळे शरीर साथ देत नसल्याचे म्हणत तिने बॅडमिंटनला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

लंडन ऑलिम्पिकमध्ये (वय – 2012) ब्रांझपदक जिंकत इतिहास घडला होता. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे सामनाच्या कारकि‍र्दीला ब्रेक लागला होता. त्यानंतर तिने 2017 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्रांझ आणि 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. मात्र त्यानंतर दुखापतींनी तिचा पिच्छा पुरवला. गेल्या दोन वर्षांपासून ती कोर्टपासूनही दूर होती. शरीर बॅडमिंटनसारख्या वेगवान खेळाचा ताण सहन करू शकत नाही. गेल्या दोन वर्षांपासून तीव्र गुडघे दुखीने त्रस्त असल्याचे म्हणत सायनाने निवृत्तीमागील कारण स्पष्ट केले.

जागतिक स्तरावर खेळण्यासाठी दिवसातून आठ ते नऊ तास सराव करणे आवश्यक असतो. मात्र गुडघ्याच्या त्रासामुळे तिला तासाभराहून अधिक काळ सराव करणे अशक्य झाले होते. सरावानंतर गुडघ्याला सूज येत असल्याने सायना नेहवाल हिने कारकि‍र्दीला पूर्णविराम लावण्याचा निर्णय घेतला. याबाबत ती म्हणाली की, मी दोन वर्षांपूर्वीच खेळणे थांबवले होते. मी माझ्या अटींवर या खेळात आले आणि माझ्याच अटींवर बाहेरही पडले. त्यामुळे याची औपचारिक घोषणा करण्याची मला गरज वाटली नाही.

सायना नेहवालची कारकि‍र्द

सायना नेहवाल गेल्या 21 वर्षांपासून बॅडमिंटनच्या कोर्टवर हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत होती. या दरम्यान तिने जागतिक स्तरावर हिंदुस्थानचा तिरंगा डौलान फडकावला. 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने ब्रांझ मेडल जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू आहे. यासह तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदके जिंकली आहेत. 2015 मध्ये तिने सिल्व्हर तर, 2017 मध्ये ब्रांझ मेडल जिंकले होते. तसेच वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये (2008) सुवर्णपदक जिंकणारी पहिली आणि एकमेव हिंदुस्थानी खेळाडू आहे.

सायना नेहवाल हिने 24 हून अधिक आंतरराष्ट्रीय जेतेपद पटकावली आहेत. यात 11 प्रतिष्ठित ‘BWF सुपरसीरीज’ ट्रॉफीचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीत तिने 2010 आणि 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते, तर 2018 मध्ये मिश्र सांघिकमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. याव्यतिरिक्त 2006 मध्ये तिने ब्रांझ, तर 2010 मध्ये सिव्हर मेडल जिंकले होते. आशियाई खेळात तिने 2014 आणि 2018 मध्ये महिला एकेरीत ब्रांझ मेडल, तर 2014 मध्ये सांघिक ब्रांझ मेडल जिंकलो होते. 2009 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार, तर 2010 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (आताचे मेजल ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार) देऊन गारविण्यात आले.

दरम्यान, सायना नेहवाल हिने 2008 बीजिंग, 2012 लंडन आणि 2016 रिओ दी जानेरो असे तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. 2015 मध्ये तिने जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले होते. बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानी पोहोचणारी ती पहिली हिंदुस्थानी खेळाडू आहे. तिने व्यावसायिक कारकि‍र्दीत 457 सामने जिंकले आहेत. यातील 446 महिला एकेरी, 9 महिला दुहेरी आणि 2 मिश्र दुहेरीचा समावेश आहे. तिने बक्षिसाच्या रुपात 7 कोटींहून अधिक रक्कम जिंकली आहे.