
जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून इंडिया आघाडीला मोठे यश मिळाले आहे. इंडिया आघाडीने 50 हून अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. कल स्पष्ट झाल्यानंतर सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री पदाची घोषणा केली. ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होतील अशी माहिती त्यांनी दिली.
जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम 2019 मध्ये हटवण्यात आले. त्यानंतर जम्मू-कश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. मात्र मधल्या काळात सर्वोच्य न्यायालयाने रखडलेली विधानसभा निवडणूक घेण्याचे आणि लवकरात लवकर राज्याचा दर्जा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार येथे तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक घेण्यात आली.
Haryana election result – विनेश फोगाटने मैदान मारलं, जुलाना मतदारसंघातून विजयी
पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात 3 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कश्मीरचा नारा दिला. मात्र हा नारा फेल गेल्याचे आजच्या निकालातून स्पष्ट झाले. 12 पर्यंतच्या आकडेवारीनुसार इंडिया आघाडी 51, भाजप 26 आणि पिडीपी 3 जागांवर आघाडीवर होते. त्यामुळे कल स्पष्ट झालं असून ओमर अब्दुल्ला पुन्हा मुख्यमंत्री होणार यावर आता फारुख अब्दुल्ला यांनी शिक्कामोर्तब केले आहे.