
वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभामंडप येथे दुपारी 12 वाजता संपन्न झाला. विवाह सोहळा संपन्न होताच वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या वाजवत, ‘या पंढरपुरात काय वाजतं गाजतं… सोन्याचं बाशिंग… लगीन देवाचं लागतं…’ या गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे लग्नस्थळीचे वातावरण अगदीच आनंदीमय झाले.
वसंत पंचमीच्या मुहुर्तावर शुक्रवारी (दि. 23) श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या लग्नाची लगीनघाई सुरू झाली. विठ्ठल मंदिरातील विठ्ठल सभा मंडप सजविण्यात आला होता, तर मंदिरातही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. एरवी टाळ-मृदुंगाच्या व विठ्ठल रुक्मिणीच्या नामघोषणेने गजबजणाऱ्या मंदिरात सकाळपासून सनई चौघडे, मंगल अक्षता याचबरोबर वऱ्हाडी मंडळींची लगबग सुरू होती. मंदिरात व मंदिराबाहेर अक्षता घेऊन देवाचे लग्न लावण्यासाठी हजारो वऱहाडी उपस्थित होते.
सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेला शुभ्र वस्त्र तसेच श्री रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.
औसेकर महाराजांनी म्हटली मंगलाष्टका
दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी म्हणजे श्री विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजविण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली. दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या. यानंतर अंतरपाट धरले आणि मंगलाष्टकास सुरुवात झाली. त्यामध्ये मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटली. मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाहीविवाह सोहळा साजरा केला. यावेळी वऱहाडी मंडळी यांनी विवाह सोहळा संपन्न होताच टाळ्या वाजवत, ‘या पंढरपुरात काय वाजतं गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं’, या गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे लग्न स्थळी वातावरण अगदीच आनंदीमय झाले.
यावेळी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ऍड. माधवी निगडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख-जळगावकर, डॉ. प्रणिता भालके, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभागप्रमुख पृथ्वीराज राऊत, संजय कोकीळ, अतुल बक्षी व राजेंद्र सुभेदार उपस्थित होते. सायंकाळी रथामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती ठेवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.






























































