पंढरीत लाखो भाविकांची मांदियाळी! पुत्रदा एकादशीनिमित्त भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजला

पुत्रदा एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व असल्याने दोन लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले होते. दर्शनरांग पत्राशेडमध्ये पोहोचली आहे. तर, सलग शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी होणार यासाठी मंदिर समितीकडून सुलभ व जलद दर्शनासाठी प्रयत्न करण्यात येत होते.

श्रावण महिन्यात गुरुवारी (15 रोजी) स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी आले. आज पुत्रदा एकादशी असल्याने भाविकांच्या गर्दीत भर पडली. भाविकांनी चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, दर्शनरांग, प्रदक्षिणामार्ग, भक्तिमार्ग फुलून गेला आहे. सलग सुट्टय़ांमुळे पंढरीनगरी भाविकांनी फुलून गेली आहे.

चंद्रभागा नदीपात्रात मुबलक पाणी असल्यामुळे भाविकांनी स्नानाचा आनंद लुटला. पंढरीत आलेले भाविक प्रथमतः स्नान करण्यासाठी चंद्रभागेत गर्दी करीत आहेत. स्नानानंतर पदस्पर्श दर्शन, तसेच मुखदर्शन व कळसदर्शन घेण्यास भाविकांनी प्राधान्य दिले. पदस्पर्श दर्शनरांग सारडा भवनच्या दिशेने पुढे पत्राशेडकडे पोहोचली होती. भाविकांना दर्शनासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागत आहे.

सलग सुट्टय़ा, पुत्रदा एकादशी आणि त्यानंतर श्रावणातील सोमवार येत असल्याने भाविक दर्शनासाठी पंढरपूरकडे येत आहेत. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला आल्यास पुत्र प्राप्त होतो, अशी आख्यायिका सांगितली जाते.

जवळपास दोन लाख भाविकांनी पंढरी गजबजली आहे. भाविकांच्या वाहनांनीदेखील वाहनतळ ‘हाऊसफुल्ल’ झाले असल्याचे चित्र दिसून येत होते. त्यामुळे बहुतांशी वाहने रस्त्याच्या बाजूला दुतर्फा लावण्यात आली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर नगरप्रदक्षिणा करण्यास भाविक पसंती देत होते. भाविक दर्शनानंतर प्रासादिक साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत होते. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या दर्शनरांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने सुरक्षारक्षकांची नेमणूक, ‘व्हीआयपी’ दर्शन व्यवस्था निर्बंध, भाविकांच्या हस्ते होणाऱया पूजांची संख्याही कमी करण्यात आली आहे. तसेच रांगेतील भाविकांना खिचडी व चहा-पाण्याची व्यवस्था केली आहे.

– मनोज श्रोत्री, व्यवस्थापक