वारणा पात्राबाहेर; अलमट्टीतून एक लाख क्युसेक विसर्ग सुरू

सांगली जिह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे वारणा, कृष्णा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चांदोली आणि कोयना धरण पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस कायम राहिला. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून, विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सांगली जिह्यातील वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. जिह्यातील वारणा नदीवरील काखे-मांगले, कुंडलवाडी पुलासह सर्व बंधारे पाण्याखाली गेले. जिह्यातही दिवसभर जोरदार पाऊस सुरूच राहिला. अलमट्टी धरणात पाण्याची आवक जास्त असल्याने कर्नाटक पाटबंधारे विभागाने शनिवारी दुपारपासून एक लाख क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.

वारणा आणि कोयना धरणक्षेत्रात दिवसभर संततधार सुरूच होती. दोन्ही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. वारणा धरणक्षेत्रात 24 तासांत 66 मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात 23.54 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 1396 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वारणा नदीवरील कुंडलवाडी, काखे-मांगले पूल पाण्याखाली गेला आहे. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे नदीवरील पुलावर पाणी आले आहे. वारणा नदीपात्रातून पाणी बाहेर पडून दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे.

जिह्याच्या पश्चिम भागात जोरदार, तर पूर्व भागात रिमझिम पाऊस झाला. सांगली, मिरज शहरांसह जिह्यातही दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दिवसभरात तीन फुटांनी वाढली. पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे. यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या प्रत्येक नागरिकाचे सध्या अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष लागले आहे. कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातून शनिवारी दुपारपासून एक लाख क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.